अर्जुन पुरस्कारापासून अनेक पात्र खेळाडूंना वंचित राहावे लागल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निकषांत पुढील वर्षांपासून बदल करण्याच्या विचारात केंद्रीय क्रीडा मंत्रालय आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी यापूर्वीच निवडप्रक्रियेत बदल करण्याचे सूतोवाच केले आहे. याबाबत मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘पुरस्कार निवड समितीने कसे खेळाडू निवडले याबाबत त्यांना कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. अर्थात ही प्रक्रिया पारदर्शक असली तरीही काही गुणवान खेळाडू या पुरस्कारापासून वंचित राहत असल्याचे क्रीडा मंत्रालयाच्या लक्षात आले आहे. या पुरस्कारासाठी ज्यांनी अर्ज केलेला नाही किंवा ज्यांची शिफारस करण्यात आलेली नाही, पण हे खेळाडू पुरस्कारासाठी पात्र असतील तर त्यांची निवड करण्याचे अधिकार मंत्रालयाकडे असावेत याबाबत विचार सुरू आहे.’’

टेनिसपटू रोहन बोपण्णाला अनेकदा अर्जुन पुरस्कारासाठी पात्र असूनही वगळण्यात आले. त्यामुळे निकषात बदल करण्याचा विचार आहे काय, असे विचारले असता, या पदाधिकाऱ्याने सांगितले, ‘‘कोणत्याही खेळाडूने टीका केल्यामुळे हा बदल होत नसून मंत्रालयानेच स्वत:हून हा बदल करण्याचे ठरवले आहे.

एखाद्या गुणवान खेळाडूचा अर्ज आला नसला तरीही त्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य  निवड समितीला दिले जाणार आहेत.’’

बोपण्णाने जूनमध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळविले होते. अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत २८ एप्रिल रोजी संपल्यामुळे त्याला पुरस्काराची संधी मिळाली नाही.

महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्वाधिक धावा करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. तिला खेलरत्न द्यावे अशी मागणी केली जात होती. मात्र पुरस्कार निवड समितीने तिच्या नावाची शिफारस केली नव्हती. त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळू शकला नाही. निवड समितीच्या बैठकीत तिच्या नावाची चर्चाही झाली होती. मात्र तिच्या नावाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा अन्य कोणत्याही संघटनेकडून शिफारस आली नसल्यामुळे तिची संधी हुकली.

सध्याच्या निकषानुसार विश्वचषक, जागतिक अजिंक्यपद, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद, राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धामधील कामगिरीचाच राष्ट्रीय पुरस्कारांसाठी विचार केला जातो.