कुस्ती आणि शरिरसौष्ठवसारख्या रांगड्या खेळांना देशात हल्ली चांगले दिवस येत असल्याचे पाहायला मिळते. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या खेळांमध्ये आता स्त्रियादेखील मागे नाहीत. मुंबईची शरिरसौष्ठवपटू श्वेता राठोड ही यापैकीच एक. ‘इंडियन बॉडी बिल्डर फॅडरेशन’च्या सहयोगाने ‘नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०१७’चे इंदौर येथील ‘बास्केट बॉल स्टेडियम’वर आयोजन करण्यात आले होते. १९ फेब्रुवारीला या स्पर्धेची अंतिमफेरी पार पडली. ज्यात श्वेताने ‘मिस इंडिया’चा किताब आणि सुवर्ण पदक जिंकले. त्याचबरोबर तिला ‘सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप’च्या ‘स्पोर्ट्स फिजिक’ विभागातदेखील पुरस्कृत करण्यात आले.

श्वेता राठोड
श्वेता राठोड

सलग तिसऱ्या वर्षी ‘मिस इंडिया’ किताब पटाकावून श्वेताने विजयाची हॅट्रिक साधली आहे. ‘एशियन बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजिक चॅम्पियनशिप २०१५’ स्पर्धेत ‘स्पोर्ट्स फिजिक विभागात’ रजत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला शरिरसौष्ठवपटू आहे. शरिरसौष्ठव खेळातील विजयाचे सातत्य ठेवणाऱ्या श्वेताने या खेळात नव्याने दाखल होणाऱ्या महिला शरिरसौष्ठवपटूंसमोर आदर्श निर्माण केला आहे. सलग तिसऱ्यांदा ‘मिस इंडिया’ किताब हस्तगत केल्याने आनंदित झाल्याची भावना व्यक्त करणाऱ्या श्वेताने ज्यांच्यामुळे तिला हे यश प्राप्त झाले त्या सर्वांचे आणि देवाचेदेखील आभार मानले.

दरम्यान, गेल्या वर्षी प्रथमच भरविण्यात आलेल्या ‘मिस मुंबई’ स्पर्धेत श्वेताने जेतेपद पटकावले होते. व्यवसायाने इंजिनीअर असलेली श्वेता आज आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपास आलेली फिटनेस ट्रेनर आणि स्पोर्ट्स फिजिक प्रकारात नावारूपास आलेली स्पर्धक आहे. आठ वर्षे कार्पोरेट जगतात काम केल्यावर आणि स्वत:ची कंपनी स्थापन केल्यावर वेगळे काही तरी करायची इच्छा तिची होती. त्यामुळेच या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय तिने घेतला.

महिलांना या क्षेत्रात करिअर करण्याच्या चांगल्या संधी आहेत. मात्र यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन श्वेताने स्वत:ची फिटनेस अकॅडमी सुरू केली. महिलांना व्यायामाचे महत्त्व पटून देणे, तंदुरुस्त बनवणे हा यामागचा श्वेताचा उद्देश आहे. शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये देशातील महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. काही वर्षांपूर्वी एखाद-दुसरी महिला अशा स्पर्धांमध्ये हजेरी लावत असे आता महिलांचा लक्षणिय सहभाग पाहायला मिळतो.