वरिष्ठ राष्ट्रीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धा पुण्यात १७ ते २१ जुलै या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल, ऑलिम्पिकपटू पी. कश्यप यांच्यासह अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले.
ही स्पर्धा मॉडर्न बॅडमिंटन संकुलात होणार असून, त्याकरिता पुरुष, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी हे विभाग ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेकरिता पाच लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, दिल्ली, गुजरात आदी राज्यांमधील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. २००६नंतर प्रथमच पुण्यात वरिष्ठ गटाची राष्ट्रीय मानांकन स्पर्धा होणार आहे.
भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदा इंडियन बॅडमिंटन लीग आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतील काही सामने आयोजित करण्याचा मान पुण्यास मिळाला आहे. १४ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत हे सामने होतील. या स्पर्धेत पुण्याची फ्रँचाईजी असणार आहे.
लक्ष्मी क्रीडा मंदिर बॅडमिंटन क्लबतर्फे आयोजित केली जाणारी सुशांत चिपलकट्टी स्मृतिचषक कुमार जागतिक स्पर्धेला यंदा आंतरराष्ट्रीय मानांकनाचा दर्जा देण्यात आला आहे.