अंजली भागवत, समरेश जंग, राही सरनोबत, पूजा घाटकर, आयोनिका पॉल आदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह चार हजारहून अधिक खेळाडू गन फॉर ग्लोरी अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ६ ते १३ सप्टेंबर दरम्यान येथे होणार आहे.
गगन नारंग स्पोर्ट्स अकादमीतर्फे व राष्ट्रीय रायफल नेमबाजी संघटनेच्या मान्यतेने शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे. गन फॉर ग्लोरी अकादमीचे संचालक पवनसिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय नियमांनुसार व राष्ट्रीय संघटनेच्या नियमांनुसार होणाऱ्या अनुभवी स्पर्धकांच्या गटात आतापर्यंत देशातील तेराशे खेळाडूंनी भाग घेतला आहे. स्पर्धेबरोबरच होणाऱ्या शालेय गटाच्या अखिल भारतीय नैपुण्य शोध चाचणी स्पर्धेत विविध राज्यांमधील अडीच हजारपेक्षा जास्त प्रवेशिका आल्या आहेत. रायफल व पिस्तूल या दोन्ही विभागात ही स्पर्धा होणार आहे. रायफलच्या अंतिम स्पर्धा ९ व १० सप्टेंबर रोजी होणार आहेत तर पिस्तूल विभागाच्या अंतिम फेरी १२ व १३ सप्टेंबर रोजी होतील. १३ सप्टेंबर रोजी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
शालेय विभागातील नैपुण्य चाचणीमधून निवडक पन्नास खेळाडूंना प्रथम श्रेणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांना पुढच्या दर्जाचे वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाईल. सवरेत्कृष्ट दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.  स्पर्धेसाठी ३१ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

दूरदर्शनवर प्रक्षेपण
स्पर्धेचे दूरदर्शनच्या क्रीडा वाहिनीवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. १२ व १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. अन्य दिवशी क्षणचित्रे दाखविली जाणार आहेत.