हरयाणातील सोनीपतनजीकच्या काकरोई गावात २१ वर्षीय राष्ट्रीय कुस्तीपटूची हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचा मृतदेह पोत्यात कोंबण्यात आले होते. त्याच्या अंगावर जखमांच्या असंख्य खुणा आढळल्या. हंसराज असे या कुस्तीगीराचे नाव असून, सोमवारी सकाळी तो फिरायला गेला होता, असे समजते. मात्र त्याचा मृतदेह गुरुवारी गावाबाहेरच्या झुडुपांमध्ये पोत्यात मिळाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मृतदेह सापडल्याच्या घटनेनंतर काकरोई गावात मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गावकरी संतप्त झाले असून, या स्वरुपाच्या पाच घटना या आधीही घडल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी दोषींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.