उत्तेजक द्रव्याचे व्यसन ही क्रीडा क्षेत्रास लागलेली कर्करोगाचीच विषारी बाधा आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्याकडे k07कानाडोळा केला जात आहे. जर आपल्या देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवायची नसेल तर या रोगाचे मुळापासूनच उच्चाटन केले पाहिजे, असे माजी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटक व प्रशिक्षक स्क्वॉड्रन लीडर (निवृत्त) बलदेवराज गुलाटी यांनी सांगितले.
देशातील वेटलिफ्टिंग क्षेत्रात उत्तेजक द्रव्यसेवनाच्या घटना मोठय़ा प्रमाणावर वाढत आहेत. अलीकडेच भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने आठ प्रशिक्षकांवर दोन वर्षांकरिता तर चार राज्य संघटनांवर एक वर्षांकरिता बंदी घातली आहे. या घटनेमुळे पुन्हा भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याविषयी गुलाटी यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

अजूनही उत्तेजक सेवनाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही असे तुम्हाला वाटते काय? या घटना पुन्हा पुन्हा का घडतात?
आपल्या देशातील वेटलिफ्टिंग क्षेत्राचे उत्तेजकाच्या विकाराने अतोनात नुकसान झाले असले, तरी संघटकांना त्याविषयी फारशी गंभीर जाणीव झालेली नाही. वेटलिफ्टिंग खेळाकडे जेव्हापासून व्यावसायिक करिअर म्हणून पाहिले जाऊ लागले तेव्हापासून झटपट पैसा व प्रसिद्धी मिळविण्याकडे खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचाही कल दिसून येऊ लागला आहे. खेळाची गुणात्मक प्रगती किती झाली याच्याऐवजी अधिकाधिक पदक मिळविण्यास महत्त्व देण्यात येत आहे. हे यश मिळविण्यासाठी खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक कोणत्याही थराला जाण्याकरिता मागेपुढे पाहत नाहीत. येनकेनप्रकारेण राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळविण्याची वृत्ती वाढत चालली आहे. बक्षीस व बढती या गोष्टी खेळाडू व प्रशिक्षकांकरिता प्रोत्साहनाऐवजी शापच ठरत आहेत. त्यामुळे खेळावरील निष्ठेला मूठमाती मिळत आहे. पदकांच्या संख्यांवर खेळाडूची नोकरी अवलंबून असते, तसेच आपल्या खेळाडूंनी किती पदके मिळविली आहेत, यावरच प्रशिक्षकांचे भवितव्य अवलंबून असते. साहजिकच अनेक वेळा प्रशिक्षकही खेळाडूंच्या वाईट सवयींना जबाबदार असतात. आपल्याला अधिकाधिक परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी कशी मिळेल यावर त्यांचा भर असतो.

उत्तेजक द्रव्याबाबत संघटना स्तरावर अपेक्षेइतके प्रयत्न होत आहेत काय?
अपेक्षेइतके प्रयत्न संघटना स्तरावर होत नाही. अनेक वेळा असे दिसून आले आहे, की उत्तेजकाच्या गंभीर घटनेस जबाबदार असलेल्या पदाधिकाऱ्यास राजीनामा देण्यास सांगतात व मागच्या दाराने पुन्हा त्याच्याकडे त्या दर्जाचीच जबाबदारी दिली जाते. उत्तेजक द्रव्य सेवनावर कोणत्याही स्तरावर संघटनेचे नियंत्रण नाही. गुणात्मक दर्जाऐवजी राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्थेतील प्रमाणपत्रास अधिक महत्त्व दिले जाते. अनेक संघांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) किंवा त्यांची शिफारस केलेले प्रशिक्षक नियुक्त केले जातात. बऱ्याच वेळा हे प्रशिक्षक सरकारी बाबूसारखेच वागत असतात. ‘साइ’च्या पदाधिकाऱ्यांना खूश करण्यावरच ते भर देतात. उत्तेजक द्रव्य सेवनावर नियंत्रण ठेवण्याची परिणामकारक यंत्रणाच ‘साइ’कडे नाही. विविध स्पर्धामध्ये काम करणारे पदाधिकारी व पंचांवरही संघटनेचे नियंत्रण नाही.

या गंभीर आरोपांबाबत दिली जाणारी शिक्षा पुरेशी आहे काय?
केवळ आर्थिक दंड आकारणे ही काही शिक्षा होऊ शकत नाही. अनेक वेळा दोषी खेळाडू आपल्याकडे दंड देण्यासाठी पैसे नाहीत असे कारण सांगतात. साहजिकच ही रक्कम भरण्याची जबाबदारी संबंधित संघटनेकडे येते. तेदेखील अनेक वेळा याबाबत हात झटकतात. हा खेळाडू जर शिक्षण घेत असेल किंवा नोकरी करीत असेल, तर अशा दोषी खेळाडूंवर संबंधित संस्थेतून निलंबनाची कारवाई झाली तर त्याला आपण केलेल्या गुन्ह्य़ाचे गांभीर्य कळू शकेल. खेळाडू व प्रशिक्षकांचे योग्य रीतीने प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. या खेळाची संख्यात्मक वाढ झाली नाही तरी चालेल. त्याऐवजी गुणात्मक वाढ कशी होईल याकडे संघटकांनी लक्ष दिले पाहिजे. खेळाडू, प्रशिक्षक व संघटक यांच्याकडे खेळासाठी आवश्यक असणारी निष्ठा नाही, उत्तेजक द्रव्याबाबत पुरेसे ज्ञान नाही, सराव शिबिरांबाबत फारशी आपुलकी नाही. यामुळेच खेळाची अधोगती होत आहे. अजून आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने आपल्या वेटलिफ्टिंग संघटनेवर कारवाई कशी केली नाही, याचेच आश्चर्य वाटत आहे. आपल्या संघटकांनी जागे होण्याची वेळ आली आहे.