भारताच्या नीरज चोप्रा याने वॉर्सा येथील आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेतील भालाफेकीत रौप्यपदक पटकाविले मात्र त्याला ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण करता आले नाहीत.

नीरज याने ७९.७३ मीटपर्यंत भालाफेक केली. त्याने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ८२.२३ मीटपर्यंत भाला फेकला होता. त्या वेळी ८३ मीटर हा ऑलिम्पिक निकष हुकला होता. वॉर्सा येथील स्पर्धेत ग्रेझसुझुक याने ८३.५० मीटपर्यंत भालाफेक करीत सुवर्णपदक जिंकले. स्लोवाकियाच्या झेनुच (७७.०७ मीटर) याने कांस्यपदक मिळविले. भारताच्या विपिन कसाना याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या विभागात आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या अन्नु राणी हिने येथे भालाफेकीत रौप्यपदक पटकाविले. तिने ५६.७६ मीटपर्यंत भालाफेक केली. मात्र ऑलिम्पिक निकष पूर्ण करण्यात तिला अपयश आले. तिची सहकारी सुमन देवी (५६.२७ मीटर) हिला चौथे स्थान मिळाले.

चोप्रा हा या स्पर्धेऐवजी जर्मनीतील स्पर्धेत सहभागी होणार होता मात्र भारताचे परदेशी प्रशिक्षक गॅरी कालव्हर्ट यांनी त्याला वॉर्सा येथील स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला. गॅरी यांनी सांगितले, वॉर्सा येथील स्पर्धेत अनेक तुल्यबळ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामुळे त्याला चांगला अनुभव मिळावा यासाठीच या स्पर्धेत उतरविले. त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. ऑलिम्पिक निकष तो पूर्ण करू शकला नाही. त्याला उज्ज्वल भवितव्य आहे.