काही महिन्यांपूर्वी झालेल्या भूकंपाने नेपाळला हादरवले. हजारो नागरिक मृत्युमुखी पडले, तर अपरिमित हानी झाली. त्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. मीसुद्धा तातडीने बचावकार्यात सामील झालो. भूकंपात मृत्यू पावलेल्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करताना अतिशय जड जायचे, हे सांगताना दिल्ली दबंगचा नेपाळी कबड्डीपटू जय बहादूर बोहराचे डोळे पाणावले होते. मोडलेली घरे आणि हरवलेले कुटुंब हे दु:ख अनेक नागरिकांच्या वाटय़ाला आले होते. पण सैन्यात कार्यरत असणाऱ्या जय बहादूरने हिमतीने आपल्या कर्तव्यांचे पालन केले. भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या नेपाळवासीयांना आता त्यांचा नायक प्रो कबड्डी लीगमध्ये पाहायला मिळतो.
भारत-नेपाळ सीमेवरील काठमांडू परिसरात ३१ वर्षीय जय बहादूरचे घर आहे. जय बहादूरचा मोठा भाऊ सोहादीन बोहरा हा राष्ट्रीय कबड्डीपटू. त्याच्याकडूनच प्रेरणा घेत १४व्या वर्षीपासून त्याने कबड्डी खेळायला प्रारंभ केला. डावा कोपरारक्षक आणि पल्लेदार चढाया या गुणवत्तेमुळे २०१०च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०११मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई समुद्रकिनारी क्रीडा स्पध्रेत त्याने नेपाळचे प्रतिनिधित्व केले.
‘‘नेपाळमध्ये हौशी स्वरूपाची कबड्डी खेळली जाते. मोजक्या संघांचा समावेश असलेली राष्ट्रीय स्पर्धाही होते. मात्र प्रो कबड्डीच्या निमित्ताने होनप्पा सी. गौडा यांच्यासारख्या प्रशिक्षकाकडून मला मार्गदर्शन मिळत आहे. पुढील महिन्यात सैन्य दलाच्या कबड्डी स्पर्धा होत आहेत. त्या वेळी चांगली कामगिरी दाखवता येईल. याचप्रमाणे आत्मसात केलेले हे तंत्र मी माझ्या देशवासीयांना शिकवेन,’’ अशी प्रतिक्रिया जय बहादूरने व्यक्त
केली.
तो पुढे म्हणाला, ‘‘माझा खेळ पाहून नेपाळमध्ये कबड्डीचे वातावरण अधिक वाढावे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सरकारनेही या खेळाला प्रोत्साहन आणि आर्थिक साहाय्य केल्यास कबड्डीचा योग्य प्रचार आणि प्रसार होऊ शकेल.’’