३-१ अशा विजयासह नेदरलँड अव्वल
जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धा
भारताच्या पुरुष संघाच्या कमकुवत बचावाचा पुरेपूर फायदा उचलताना नेदरलँडने जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेत ‘ब’ गटात ३-१ असा दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह नेदरलँडने सात गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले असून भारत (१ गुण) तळाला आहे.
ग्रेट ब्रिटनला बरोबरीत रोखल्यानंतर उंचावलेल्या मनोबलाने मैदानात उतरलेल्या भारताने पहिल्या सत्रात नेदरलँडला कडवी झुंज दिली. उत्तम बचाव आणि तितकाच आक्रमक खेळ करून भारताने सामन्यावर पकड घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. ३६व्या मिनिटाला मिंक व्ॉन डेर वीर्डेनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून नेदरलँडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४३व्या मिनिटाला मिर्को प्रुइज्सेरने अप्रतिम मैदानी गोल करताना ही आघाडी दुप्पट केली.
अखेरच्या १५ मिनिटांच्या खेळात भारताने अधिक आक्रमक खेळ करून पाहुण्यांच्या गोलजाळीवर हल्ला चढवला. ४७व्या मिनिटाला त्याचे फळ भारताला मिळाले. चिंग्लेनसाना कंगुजामने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा आनंद क्षणीक ठरला. ५४व्या मिनिटाला रोएल बोव्हेंडीर्टने गोल करून नेदरलँडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता बुधवारी उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ ‘अ’ गटातील अव्वल संघाशी पडेल.