नेदरलँड्सला तीन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याची नामुष्की, तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदासाठी उत्सुक असलेला अर्जेटिनाचा संघ, जगातील सर्वोत्तम ड्रिबलर्स असलेले आर्येन रॉबेन विरुद्ध लिओनेल मेस्सी अशी ‘काँटे की टक्कर’ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अनुभवायला मिळणार आहे. बुधवारी मध्यरात्री रंगणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेटिना आणि नेदरलँड्स हे संघ अंतिम फेरीचे दार ठोठावण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
लिओनेल मेस्सीने झळकावलेल्या चार गोलमुळे अर्जेटिनाने १९९०नंतर प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारली आहे, पण उपांत्य फेरीत अर्जेटिनाचा संघ एकदाही पराभूत झालेला नाही, हे नेदरलँड्सला ध्यानात घ्यावे लागणार आहे. नेदरलँड्सने स्पर्धेत आतापर्यंत कोलंबियानंतर सर्वाधिक १२ गोल लगावले असून त्यांच्या यशात रॉबेन आणि रॉबेन व्हॅन पर्सी (प्रत्येकी तीन गोल) तसेच मेम्फिस डेपे (दोन गोल) यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. रॉबेनचे चेंडूवरील कौशल्य, हेच ‘ऑरेंज आर्मी’चे यशाचे रहस्य आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत ऊर्जा, वेग, अप्रतिम ड्रिब्लिंग आणि भन्नाट गोल असा नजराणा चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
बाद फेरीनंतर नेदरलँड्सला दोनच गोल करता आल्यामुळे त्यांची मदार पुन्हा एकदा व्हॅन पर्सीवर असणार आहे. व्हॅन पर्सीने वेगाच्या अभावामुळे कोस्टा रिकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गोल करण्याच्या दोन सुरेख संधी वाया घालवल्या. मधल्या फळीत नेदरलँड्सला नायजेल डे जाँगची कमतरता जाणवणार आहे. त्याच्या जागी लेरॉय फेर याला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वित्र्झलडविरुद्धच्या सामन्यात अतिरिक्त वेळेत गोल करून अर्जेटिनाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा अँजेल डी मारिया दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. हा अर्जेटिनासाठी फारच मोठा धक्का आहे. मात्र सर्जिओ अ‍ॅग्युरो दुखापतीतून सावरला असल्याने अर्जेटिनाला हायसे वाटले असेल.

बाद फेरीत पर्सी गोल साकारणार?
साओ पावलो : रॉबिन व्हॅन पर्सी हा नेदरलँड्सचा हुकमी एक्का. सातत्यपूर्ण गोल करण्याची त्याची क्षमता नेदरलँड्ससाठी फलदायी ठरली आहे. परंतु अर्जेटिनाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीच्या निमित्ताने व्हॅन पर्सीला एक नकोशी आकडेवारी बदलायची आहे. मोठय़ा स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये बरेच गोल करणाऱ्या पर्सीला बाद फेरीत मात्र गोल करता येत नाही. स्पेनविरुद्धच्या त्याच्या गोलनेच नेदरलँड्सच्या विजयी अभियानाची सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने गोल केला, मात्र त्यानंतर गोलच्या संख्येत घट झाली आहे. विशेष म्हणजे कारकिर्दीत आतापर्यंत खेळताना महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बाद फेरीत त्याला अद्याप गोल करता आलेला नाही. हा डाग पुसून टाकायचा चंग पर्सीने बांधला आहे. पर्सीने ही आकडेवारी बदलल्यास अर्जेटिनासाठी तो धोक्याचा इशारा असू शकतो.

गाल यांचे डावपेच यशस्वी
साओ पावलो : अर्जेटिनाविरुद्धची उपांत्य फेरीची लढत म्हणजे नेदरलँड्सच्या विश्वचषक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा. या सामन्याचा निकाल काय लागेल, हे येणारा काळच ठरवेल. मात्र नेदरलँड्सच्या वाटचालीने प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांच्या कर्तृत्व सिद्ध झाले आहे. मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत व्हॅन गाल यांनी डिर्क क्युयटला तीन पोझिशन्समध्ये खेळवत सुरेख चाल खेळली. क्युयचनेच निर्णायक गोल करत या सामन्यात नेदरलँड्सला शानदार विजय मिळवून दिला. कोस्टा रिकाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटच्या वेळी राखीव गोलरक्षक टिम क्रुलला खेळवण्याचे त्यांचे डावपेच यशस्वी ठरले. क्लब स्तरावर मँचेस्टर युनायटेडला व्हॅन गाल यांनीच विजयपथावर आणले होते.

किमयागार सबेला
साओ पावलो : २०११मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर अर्जेटिनाला विजयपथावर आणण्याची जबाबदारी अलेजांड्रो सबेला यांच्यावर सोपविण्यात आली. त्या वेळी असंख्य माजी खेळाडूंनी सबेला यांच्या नियुक्तीवर जोरदार टीका केली होती. मात्र त्या वेळी त्यांनी या टीकेला कोणतेही प्रत्युत्तर दिले नव्हते. बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतूनच त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अर्जेटिनाने तब्बल २४ वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अर्जेटिनाच्या या यशात सबेला यांची भूमिका निर्णायक आहे. महान खेळाडू दिएगो मॅराडोना यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना अर्जेटिनाच्या संघाला जी गोष्ट जमली नाही, ती किमया सबेला यांनी करून दाखवली आहे. अर्जेटिनाचा संघ लिओनेल मेस्सीवर विसंबून आहे, ही टीका होत असतानाच सबेला यांनी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले. हा निर्णय किती योग्य होता, हे अर्जेटिनाच्या कामगिरीतून सिद्ध झाले आहे. तीन वर्षांपूर्वी जे माजी खेळाडू सबेला यांच्या नियुक्तीविरोधात बोलत होते, तेच आज सबेला यांच्या कार्यपद्धतीवर स्तुतिसुमने उधळत आहेत. या बदलावरही सबेला यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही, यातच त्यांच्या यशाचे गुपित दडले आहे.

आमने-सामने  
सामने : ४    नेदरलँड्स : २, अर्जेटिना : १, बरोबरी : १

गोलपोस्ट
माझ्या हवेत झेप घेण्याच्या प्रकारावर गेल्या काही दिवसांपासून बरीच टीका होत आहे. या टीकेला आता मी वैतागलो आहे. त्याबद्दल मी माफीही मागितली आहे. सध्या सर्वच खेळाडू मला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सुदैवाने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अर्जेटिनाला कडवी लढत देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
– आर्येन रॉबेन, नेदरलँड्सचा आक्रमकवीर

आक्रमणाच्या बाबतीत जगातील सर्वोत्तम संघ असलेल्या नेदरलँड्सशी आम्ही झुंज देणार आहोत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांना प्रतिहल्ले चढवण्याची संधी न देण्याची जबाबदारी आमच्यावर असेल. नेदरलँड्सकडे तीन चांगले आक्रमकवीर आहेत. आमच्याकडून गोलक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवण्यात गलथानपणा झाल्यास, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागेल.
जेवियर मॅस्चेरानो, अर्जेटिनाचा खेळाडू

व्यूहरचना
सामना क्र. ६२
अर्जेटिना वि. नेदरलँड्स
* स्थळ : कोरिन्थिआन्स एरिना, साओ पावलो
* वेळ : मध्यरात्री १.३० वा. पासून

अर्जेटिना आणि नेदरलँड्स हे दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले असून नेदरलँड्सने चार सामने जिंकले असून फक्त १९७८ मध्ये एकमेव सामना गमावला आहे.

अर्जेटिनाने दोन वेळा (१९७८, १९८६) विश्वचषक जिंकला आहे, पण तीन वेळा अंतिम फेरीत धडक मारूनही (१९७४, १९७८ आणि २०१०) नेदरलँड्सला रिक्त हस्तेच मायदेशी परतावे लागले आहे.

गोंझालो हिग्युएनने लिओनेल मेस्सीच्या विश्वचषकातील पाच गोलांच्या विक्रमाशी बेल्जियमविरुद्ध बरोबरी साधली. हिग्युएनने नऊ सामन्यांत तर मेस्सीने १३ सामन्यांत हे गोल केले आहेत.

मेस्सीने दिएगो मॅराडोना यांच्या ९१ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मेस्सीला मॅराडोना यांचा विश्वचषकातील आठ गोलांचा विक्रम मोडण्यासाठी चार गोलांची आवश्यकता आहे.

विश्वचषक २०१४मध्ये अर्जेटिनाने केलेल्या आठ गोलपैकी चार गोल मेस्सीने झळकावले आहेत, तर नेदरलँड्सने आतापर्यंत सर्वाधिक १२ गोल केले असून त्यात रॉबिन व्हॅन पर्सी आणि आर्येन रॉबेन यांचा प्रत्येकी तीन गोलांचा वाटा आहे.

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात ब्राझील आणि अर्जेटिना हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याची ही पहिलीच वेळ आहे.