प्रायोगिक स्वरूपातील तिरंगी लीगवर बचावपटूंचेच वर्चस्व

क्रिकेट हा जसा फलंदाजांचा खेळ मानला जातो, तसा कबड्डी हा चढाईबहाद्दरांचा. परंतु महिलांच्या प्रायोगिक स्वरूपातील तिरंगी लीगसाठी पुरुषांचेच मैदान वापरले गेल्यामुळे चढाईपटूंच्या कौशल्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पकडपटूंचाच खेळ प्रामुख्याने दिसून येत आहे. परिणामी पुढील हंगामाला सामोरे जाताना महिलांसाठी त्यांच्यासाठी अस्तित्वात असलेल्या आकाराचेच मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कबड्डीवर्तुळात जोर धरत आहे.

पुरुषांचा खेळ ज्या पद्धतीने धसमुसळेपणाचे दर्शन घडवतो, त्या तुलनेत महिलांच्या कबड्डीकडूनही क्रीडा क्षेत्रात मोठय़ा अपेक्षा केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या नियमित मैदानाऐवजी पुरुषांचेच मैदान त्यांना उपलब्ध करून देण्यात आले. या मैदानावर महिलांचा अपेक्षित खेळ बहरू न शकल्यामुळे भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांच्यासह कबड्डी क्षेत्रातील अनेक जाणकारांनी नाराजी प्रकट केली आहे.

या स्पध्रेतील चढाईपटूंच्या एकंदर कामगिरीचा वेध घेतल्यास आइस दिवाजच्या सोनाली शिंगटेने पाच सामन्यांतून ११ गुण मिळवले आहेत, तर दुसऱ्या स्थानावरील अभिलाषा म्हात्रे आणि फायर बर्ड्सची कर्णधार ममता पुजारी यांच्या खात्यावर प्रत्येकी ९ गुण जमा आहेत. या स्पध्रेत दहा गुणांचा टप्पा एकमेव चढाईपटूला साधता आला आहे. परंतु पकडपटूंच्या एकंदर कामगिरीचा आढावा घेतल्यास सहा जणींना दहा गुणांचा टप्पा गाठता आला आहे. यातूनच पकडपटूंचे वर्चस्व दिसून येते. फायर बर्ड्सची किशोरी शिंदे (१२ गुण) या यादीत आघाडीवर आहे, तर दीपिका जोसेफ (४ सामन्यांत ११ गुण) दुसऱ्या आणि सोनाली इंगळे (१० गुण) तिसऱ्या स्थानावर आहे.

महिलांच्या लीगमध्ये प्रत्येक सामन्यातील यशस्वी पकडींची सरासरी ९.११ गुण अशी आहे, तर यशस्वी चढायांची सरासरी फक्त ४.८१ गुण इतकी आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयोजकांना महिला कबड्डीच्या व्यावसायिक लीगचा विचार करण्यापूर्वी मैदानाच्या आकाराचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

पुरुषांच्या मैदानांवर महिलांचे सामने झाल्यामुळे बचावपटूंचेच वर्चस्व दिसले. कबड्डीत चढाईपटू खेळला, तरच प्रेक्षक त्याचा आनंद लुटतो. मात्र हाच अभाव यात दिसून आला. आता प्रो कबड्डीत मोठय़ा मैदानावर जी कबड्डी दिसते आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक महिलांच्या कबड्डीत नजाकत आहे. मात्र हे कौशल्यच या सामन्यांमध्ये दिसले नाही. टीव्हीवरील सामन्याचे दडपण त्यांच्यावर आले असण्याची शक्यता आहे.

राजेश ढमढेरे, राजमाता जिजाऊचे प्रशिक्षक

वर्षांनुवष्रे महिला ज्या मैदानावर कबड्डी खेळतात, त्याच मैदानावर प्रो कबड्डी व्हायला हवी, तर ती पुरुषांपेक्षा आकर्षक आणि प्रेक्षणीय होईल. ही सुधारणा करून पुढील हंगामात महिलांची प्रो कबड्डी लीग यशस्वीपणे होऊ शकते.

राजेश पाडावे, शिवशक्तीचे प्रशिक्षक