प्रत्येक संघ विजेतेपदासाठीच खेळत असतो, धडपडत असतो.. त्या दृष्टीनेच त्यांचे प्रयत्न सुरू असतात, कामगिरी होतेही चांगली, पण विजेतेपद मात्र त्यांच्या नशिबात नसते.. खेळामध्ये मेहनत, सरावाबरोबरच थोडे फार नशीबही लागतेच.. काही नवीन खेळाडू संघात येतात आणि त्यांच्या पायगुणाने संघ विजेतेपदाला गवसणी घालतो.. असेच काहीसे घडले आहे ते मुंबईच्या रणजी संघाचे.. गेली काही वर्षे मुंबई रणजी ‘चालिसा’ पूर्ण करण्यासाठी धडपडत होती, पण यावर्षी मुंबईला जेतेपदे पटकावून विजयाची ‘चाळिशी’ पूर्ण करता आली. या वर्षी मुंबईसाठी दोघांनी पदार्पण केले आणि कदाचित ते दोघे संघासाठी ‘यशदायी’ ठरले असावेत, हे दोघे म्हणजे डावखुरा फिरकीपटू विशाल दाभोळकर आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर.
या दोघांनी याच वर्षी पदार्पण केले आणि या दोघांवर विश्वास ठेवत त्यांना अंतिम फेरीतही खेळण्याची संधी मिळाली. याबाबत विशाल म्हणाला की, ‘‘संघात मी असो किंवा नसो मुंबईचे जिंकणे महत्त्वाचे आहे. माझे हे पहिलेच वर्ष होते आणि त्याच वर्षांत विजय मिळाल्याने नक्कीच आनंद झाला आहे. खरे तर संघातील अनुभवी खेळाडूंचा यामध्ये मोठा हातभार आहे. सचिन तेंडुलकरसारख्या महान क्रिकेटपटूचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले. चेंडू कसा आणि कुठे टाकायचा, याचबरोबर बळी मिळविण्यासाठी काय करायला हवे, हे सचिनकडून आम्हाला शिकायला मिळाले. मध्य प्रदेशविरुद्धचा सामना आम्ही जिथे जिंकला तिथेच आम्हाला वाटले की यंदा विजेतेपद आम्हीच पटकावणार. पण आम्ही गाफील मात्र नक्कीच नव्हतो. यापुढेही विजयांची मालिका सुरूच राहायला हवी, अशीच इच्छा आहे.’’
शार्दुलच्या रूपात एक युवा वेगवान गोलंदाज मुंबईला मिळाला आहे, तो म्हणाला की, ‘‘या विजेतेपदाबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील, शब्दांत याचे वर्णन करताच येणार नाही. पहिल्याच वर्षी मला विजेतेपद पाहता आले, याचा नक्कीच आनंद आहे. प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी आणि कर्णधार अजित आगरकर यांनी आमच्यावर भरपूर मेहनत घेतली. त्याचबरोबर सचिन आणि झहीर खान यांच्या अनुभवाचाही या विजयात मोठा वाटा आहे. प्रत्येक चेंडूगणिक सचिन मला मार्गदर्शन करत होता. मध्य प्रदेशविरुद्धचा सामना जिंकल्यावर संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यानंतर उपांत्य सामना जिंकल्यावर तर विजेतेपद पटकावायचेच, हा सर्वानीच निर्धार केला होता. सर्वांच्या मेहनतीला चांगले फळ मिळाले. आता यापुढे तंदुरुस्ती आणि गोलंदाजीतील चुका दुरुस्त करण्यावर माझा भर असेल. विजेतेपदाबद्दल बोलाल, तर विजयाची ही घडी अशीच राहावी असेच वाटते.’’