क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार मिळाल्यानंतर राज्यवर्धनसिंह राठोड यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आपल्या मंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर राज्यवर्धन राठोड यांनी काही तासांपूर्वी नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु मैदानातील ‘साई’ (Sports Authority of India) च्या कार्यालयाला अनपेक्षित भेट दिली. यावेळी ‘साई’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा, मैदानांची अवस्था या सर्व कामकाजांचा क्रीडामंत्र्यांनी आढावा घेतला.

आपल्या भेटीची ट्विटर अकाऊंटवर माहिती देताना राज्यवर्धन राठोड यांनी आपल्यासाठी खेळाडू हे सर्वात महत्वाचे असल्याचं सांगितलं. “जेव्हा सर्वोत्तम कामाची अपेक्षा असते, तेव्हा फक्त चांगलं काम करुन भागत नाही. त्यामुळे यापुढे खेळाडू आणि त्यांना हव्या असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणं हे माझं प्रथम कर्तव्य असेल. अधिकारी वर्ग आणि इतर बाबी या दुय्यम असतील.”

अवश्य वाचा – Cabinet Reshuffle : खेळाडूच्या हाती क्रीडामंत्रालयाची कमान

“सन्मान आणि सुविधा या दोन मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देत क्रीडामंत्रालयाने कारभार केला पाहिजे. देशातील प्रत्येक खेळाडूचा आदर होणं आणि त्यांना योग्य त्या सुविधा मिळणं हेच ध्येय सर्वांसमोर असलं पाहिजे. या मंत्रालयाच्या कामकाजाची पद्धत बदलणं गरजेचं आहे. क्रीडा मंत्रालयात फक्त खेळाडू हाच व्हीआयपी असला पाहिजे, बाकी कोणीही नाही”, असं म्हणत राज्यवर्धन राठोड यांनी आपल्या कामाच्या शैलीची पद्धत अधिकारी वर्गाला समजावून दिली.

या मंत्रालयात मंत्री म्हणून येण्याआधी मी सर्व बाबी भोगल्या आहेत. एका पेपरवर सही करण्यासाठी खेळाडूंना किती वाट बघावी लागते, हे मी पाहिलं आहे. यापुढे अशा गोष्टी अजिबात व्हायला नको, असं राठोड यांनी स्पष्ट केलंय. सध्या राज्यवर्धन राठोड यांच्यासमोर राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिक खेळांसाठी भारतीय संघाला योग्य त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचं आव्हान आहे.