ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगला मागे टाकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वाधीक वन-डे शतकांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. रिकी पाँटींगचा ३० शतकांचा विक्रम कोहलीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मोडला, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात १२१ धावांची शतकी खेळी करत विराटने रिकी पाँटीगला मागे टाकलं. विराटने आपल्या २०० व्या आंतराष्ट्रीय वन-डे सामन्यात हा विक्रम केल्यामुळे त्याच्या या शतकी खेळीला आणखी महत्व प्राप्त झालेलं आहे.

वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधीक शतकांच्या यादीत विराट कोहलीच्या पुढे आता भारताचा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. आंतराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती स्वीकारलेल्या सचिनच्या नावावर वन-डे सामन्यात ४९ शतकं जमा आहेत. याव्यतिरीक्त कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने ५१ शतकं केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतकं जमा आहेत.

वानखेडे मैदानावरली वन-डे सामन्यात शतक झळकावत, विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये वानखेडे मैदानावर शतक झळकावणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीनने १९८७ साली श्रीलंकेविरुद्ध, तर सचिन तेंडुलकरने १९९६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकलं होतं.