आशिया उपखंडात प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी विजयाचा आनंद मिळवण्याच्या उद्देशाने न्यूझीलंडच्या संघाने कोलंबो कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेला विजयासाठी ३६३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि त्यानंतर श्रीलंकेच्या ४ अव्वल फलंदाजांना तंबूची वाट दाखवत कसोटी विजयाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
६ बाद २२५ वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेचा पहिला डाव २४४ धावांतच आटोपला. भरवशाचा फलंदाज थिलान समरवीरा वैयक्तिक धावसंख्येत भर न घालता तंबूत परतला. न्यूझीलंडला ६८ धावांची आघाडी मिळाली. टीम साऊदीने ५ तर ट्रेंट बोल्टने ४ बळी टिपले. न्यूझीलंडची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली. पहिल्या डावातील शतकवीर रॉस टेलरने या डावातही ७४ धावांची शानदार खेळी केली. ब्रेंडान मॅक्युल्लम आणि टॉड अ‍ॅस्टल यांनी प्रत्येकी ३५ धावा करत टेलरला चांगली साथ दिली. न्यूझीलंडने ९ बाद १५४ धावांवर आपला डाव घोषित केला. रंगना हेराथने सर्वाधिक ३ बळी घेतले. विजयासाठी ३६३ धावांचे लक्ष्य मिळालेल्या श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. थरंगा पर्णविताना साऊदीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
आक्रमक फलंदाज तिलकरत्ने दिलशानला बाद करत साऊदीने श्रीलंकेला अडचणीत टाकले. डग ब्रेसवेलने कुमार संगकाराला त्रिफळाचीत करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. संगकारापाठोपाठ ब्रेसवेलने कर्णधार महेला जयवर्धनेला बाद केल्यामुळे न्यूझीलंडने या कसोटीवर घट्ट पकड मिळवली आहे.
चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या ४ बाद ४७ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडला विजयासाठी ६ विकेट्सची गरज असून श्रीलंकेला ३१६ धावांची आवश्यकता आहे.