नेयमार, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आदी महागडय़ा फुटबॉलपटूंचे वारसदार घडवणारी स्पर्धा म्हणूनच कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धेकडे पाहिले जात आहे. ही स्पर्धा भारतात ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघातर्फे (फिफा) प्रतिष्ठेची विश्वचषक स्पर्धा होत असल्यामुळे त्याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. केवळ भारतीय संघटक नव्हे तर जगातील सर्वच फुटबॉल व्यावसायिक क्लबच्या संघटकांसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची आहे. भावी वलयांकित खेळाडू याच स्पर्धेतून घडणार असल्यामुळे त्यांचेही या स्पर्धेकडे बारकाईने लक्ष लागले आहे.

रोनाल्डिन्होने १९९७ मध्ये इजिप्त देशात आयोजित केलेल्या कुमार विश्वचषक स्पर्धेत ब्राझील संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. याच स्पर्धेत कॅसिलासच्या प्रभावी खेळाच्या जोरावर स्पेनने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यानंतर २००१ मध्ये झालेल्या कुमार विश्वचषक स्पर्धेत स्पेनकडून झेव्हियर, इनिएस्टा यांनी चमकदार कामगिरी केली होती. याच दोन खेळाडूंनी तेथूनच खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली. क्रुझ व गोएट्झ यांनी कुमार गटाबरोबरच वरिष्ठ गटातही जर्मनीला विश्वचषक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. कुमार गटाच्या स्पर्धेतूनच जगाला गिओव्हानी सांतोस, जेम्स रॉड्रिग्ज, अ‍ॅलेझँड्रो डेल पिएरो, लंडन डोनोव्हान, नवाकुओ कानू, सेझ फॅब्रिगास, कालरेस तेवेझ, जेव्हियर मॅशारानो, एस्टेबान कॅम्बिआसो, डॅनी वेलबेक आदी अव्वल दर्जाचे खेळाडू लाभले आहेत.

रोनाल्डिन्होने १९८७ मध्ये कुमार विश्वचषक व २००२ मध्ये वरिष्ठ विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले आहे. कॅसिलासच्या नेतृत्वाखाली २०१० मध्ये स्पेन संघाने अजिंक्यपद मिळवले आहे. पोर्तुगालच्या लुईस फिगोनेही कुमार विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचप्रमाणे चुकी बेन सादा, नेव्हेन सुबोटिक, व्हिक्टर मोझेस, टॉमी स्मिथ, हसन येबदा यांनीही कुमार गटाच्या विश्वचषक स्पर्धेतूनच कारकीर्द घडवली आहे.