मेस्सी, नेयमार, पॅको यांचे गोल; अ‍ॅलाव्हेसवर ३-१ अशी मात

बार्सिलोना फुटबॉल क्लबने प्रशिक्षक लुइस एन्रिक यांना जेतेपदाने निरोप देण्याचा केलेला निर्धार शनिवारी पूर्ण केला. मध्यरात्री झालेल्या लढतीत बार्सिलोनाने ३-१ अशा फरकाने अ‍ॅलाव्हेस क्लबवर मात करून कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद कायम राखण्यात यश मिळवले. बार्सिलोनाचा प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सी, नेयमार आणि पॅको यांनी प्रत्येकी एक गोल केला. कोपा डेल रे स्पध्रेची सर्वाधिक २९ जेतेपदे बार्सिलोनाच्या नावावर आहेत.

बार्सिलोना क्लबसोबत तीन मोसमांमध्ये प्रशिक्षक  एन्रिक यांच्या नावावर नऊ जेतेपदे असून या स्पध्रेत ६४ वर्षांनंतर जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्याचा मान एन्रिक यांना मिळाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोनाने सलग तिसऱ्यांदा हा चषक जिंकला. ला लिगा आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेतील अपयश मागे टाकून एन्रिक यांना विजयी निरोप देण्यासाठी बार्सिलोनाच्या खेळाडूंनी कंबर कसली होती. त्यामुळे नैराश्य झटकून देत त्यांना येथे उल्लेखनीय खेळ केला.

मेस्सीने ३०व्या मिनिटाला बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली, परंतु तीन मिनिटांत थीओ हर्नाडीझने सामना बरोबरीत आणला. पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटात नेयमार व पॅकोने लागोपाठ दोन गोल करत बार्सिलोनाला ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.  फेरंस पुस्कास (१९६०, १९६१ व १९६२) यांच्यानंतर कोपा डेल रे स्पध्रेच्या सलग तीन अंतिम लढतीत गोल करणारा नेयमार (२०१५, २०१६ व २०१७ ) हा पहिलाच खेळाडू आहे. दुसऱ्या सत्रात बार्सिलोनाने सावध खेळ करताना विजय निश्चित केला.

  • ०२ : कोपा डेल रे स्पध्रेच्या चार अंतिम सामन्यांत गोल करणारा लिओनेल मेस्सी (२००९, २०१२, २०१५ व २०१७) हा दुसरा खेळाडू आहे. याआधी टेल्मो झारा यांनी (१९४२, १९४३, १९४४, १९४५ व १९५०) असा पराक्रम केला आहे.
  • ६४ : कोपा डेल रे स्पध्रेत ६४ वर्षांनंतर जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करणारा बार्सिलोना हा पहिलाच संघ ठरला. यापूर्वी १९५१ ते ५३ या कालावधीत बार्सिलोनानेच सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते.