चार दिवसांपूर्वी फॉम्र्युला-वन शर्यतीचे विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या निको रोसबर्गने शुक्रवारी निवृत्तीची तडकाफडकी घोषणा केली आणि सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. मर्सिडिज संघाच्या या शर्यतपटूने व्हिएन्ना येथे एफआयए विश्वविजेतेपद पुरस्कार वितरण सोहळ्यात ही घोषणा केली. ‘विश्वविजेतेपदाचा चषक स्वीकारतानाचा हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. पण हा क्षण आता आश्चर्यकारक ठरणार आहे, कारण मी निवृत्तीची घोषणा करीत आहे,’ अशी रोसबर्गने घोषणा केली.

‘सहाव्या वर्षी मी या खेळाकडे वळलो आणि २५ वर्षांच्या कारकीर्दीत एक स्वप्न मनाशी बाळगले होते आणि ते म्हणजे एफ-वनचे विश्वविजेतेपद.. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची मी मानसिक तयारी केली. हे यशोशिखर पादाक्रांत करायचे होते. कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर मी आहे, त्यामुळे निवृत्ती स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे,’ असे रोसबर्ग म्हणाला. रविवारी अबुधाबी येथे पार पडलेल्या मोसमातील अखेरच्या शर्यतीत दुसरे स्थान निश्चित करताना रोसबर्गने कारकीर्दीतले पहिलेवहिले विश्वविजेतेपद पटकावले होते. त्याने संघ सहकारी व तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या लुईस हॅमिल्टनला पाच गुणांनी पिछाडीवर टाकले होते.

सुझुका स्पध्रेत विजय मिळवल्यानंतर निवृत्तीचा विचार डोक्यात रेंगाळत होता, असेही रोसबर्गने सांगितले. तो म्हणाला, ‘सुझुका येथे जिंकल्यानंतर विश्वविजेतेपदाच्या नशिबाची गाठ माझ्या हातात होती. त्यानंतर दडपण वाढत गेले आणि विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर निवृत्तीचा विचार करू लागलो. अबुधाबी येथे आपल्या कारकीर्दीतली अखेरची शर्यत असेल, याची कल्पना होती. त्यामुळे या शर्यतीच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा होता आणि त्या ५५ फेऱ्या आयुष्यातील सर्वात खडतर काळ होता. जेतेपदासह वर्तुळ पूर्ण झाले आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी मी निवृत्तीचा निर्णय निश्चित केला.’

संघव्यवस्थापक व्हिव्हियन आणि जॉर्ज नोल्टे यांना सर्वप्रथम निवृत्तीच्या निर्णयाची कल्पना दिल्याचे रोसबर्गने स्पष्ट केले. या निर्णयाने संघावर होणाऱ्या परिणामाविषयी तो म्हणाला, ‘निवृत्तीचा निर्णय अवघड नव्हता. फक्त या निर्णयामुळे संघाला खडतर परिस्थितीत ढकलत असल्यामुळे थोडासा तणावात होतो, परंतु ते समजून घेतील.’