भारत हा क्रिकेटवेडा देश आहे. क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना दैवते मानणाऱ्या या देशात गेल्या काही दिवसांत क्रांती घडली आहे. बॅडमिंटन आणि टेनिस या पूर्णपणे पाश्चिमात्य देशांचे प्रभुत्व असलेल्या खेळांमध्ये भारताचा झेंडा डौलाने फडकवण्याचा पराक्रम दोन रणरागिणींनी दाखवला आहे. सायना नेहवालने एकेरीत तर सानिया मिर्झाने दुहेरीत आपापल्या खेळातील जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केले आहे. या निमित्ताने त्यांच्या खडतर प्रवासाचा वेध-

खेळाडू मोठा झाल्यावर त्याला थेट मखरातच बसवण्याची आपली संस्कृती. असं हे मखरात बसवल्यानंतर या खेळाडूनं कसं वागावं आणि काय करू नये याची अलिखित संकेतपुस्तिकाच लागू होते. यश, जेतेपदं, k03क्रमवारीत भरारी असं काही मिळवणाऱ्या खेळाडूने शक्यतो भूमिका घेऊ नये, कुठल्याच विषयावर. घेतली तरी मनोमनी घ्यावी, जाहीर नाही. या खेळाडूने नेहमी मधाळ, छापील बोलावं. संघटना, सरकार यांच्याविषयी बोलूच नये आणि बोलण्याची वेळ आलीच तर ते चौकटबद्ध असावं. या खेळाडूने २४ तास आणि सातही दिवस खेळाप्रती रगडून घ्यावं. खेळ सोडून पलीकडच्या जगाचा आनंद वगैरे घेऊ नये. या खेळाडूने वैयक्तिक आयुष्यतही अगदी आदर्शवत राहावं. एकुणातच चुका वगैरे करू नयेत. अशा एकांगी विचारसरणीच्या वातावरणात सानियाने क्रमवारीत अव्वल स्थानी घेतलेली झेप आश्चर्यकारक आहे.
सानियाच्या स्कर्टच्या लांबीवर इस्लाममधील कर्मठ गटाने आक्षेप घेतला. सानियाने प्रत्युत्तर दिलं नाही आणि स्कर्टची लांबीही वाढवली नाही. थोडय़ा दिवसांनी या गटानंच नमतं घेतलं. ऑस्ट्रेलियातील एका स्पर्धेदरम्यान तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी सानियाविरुद्ध भोपाळ येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने छायाचित्राची सत्यासत्यता तपासली आणि सानियाला समन्स बजावला. परंतु उच्च न्यायालयाने हा खटला निकाली काढला. सुरक्षाव्यवस्थेचे पैसे न दिल्याप्रकरणी अचानकच सानियाला नोटीस बजावत ती काढून घेण्यात आली. मात्र थोडय़ाच दिवसांत ती पुन्हा देण्यात आली. आंध्र प्रदेशमधील विझीनगरम् जिल्ह्यातल्या लक्ष्मी नावाच्या महिलेच्या रेशन कार्डावर सानियाचे छायाचित्र छापलेले आढळले. दारिद्रय़रेषेखालील गटासाठीच्या कार्डावर लखपती सानिया असा डंका पिटवण्यात आला. मात्र यात सानियाची नव्हे, तर ते रेशन कार्ड देणाऱ्या सरकारी विभागाची चूक आहे, हे लक्षात आल्यावर प्रकरण मागे पडलं. ‘‘सानियावर माझं प्रेम आहे आणि तुम्ही तिच्याशी माझा विवाह करून द्या,’’ अशी मागणी करत २८ वर्षीय मोहम्मद अशरफनं सानियाच्या वडिलांशी हुज्जत घातली. पेशाने अभियांत्रिकी पदवीधर असणाऱ्या अशरफची मागणी पूर्ण करणे शक्यच नव्हते. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि अशरफची रवानगी तुरुंगात झाली. थोडय़ा दिवसांनंतर सानियाचा सोहराब मिर्झा या युवकाशी रीतसर साखरपुडा ठरला. सेलिब्रेटी सानिया विवाहाच्या बेडीत अडकणार त्यामुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांना चर्वितचर्वण करायला विषयच मिळाला. दुर्दैवानं हे लग्न मोडलं आणि याच वाहिन्यांनी अहोरात्र उच्छाद मांडला. काही वर्षांनंतर सानियानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्यासाठी पाकिस्तानचाच तरुण मिळावा का, आपल्या देशात लायक तरुण नाहीत का? हा सूर आळवणारे चर्चा-परिसंवाद आणि समाजमाध्यमांमध्ये पोस्ट्स व्हायरल झाल्या. लग्न होण्यापर्यंतच्या काळात काही उत्साही प्रसारमाध्यमांनी सानिया-शोएबच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तहेराप्रमाणे नजर ठेवली. हे सगळं शमतंय तोच ऑलिम्पिकचा फार्स घडला. लिएण्डर पेस आणि महेश भूपती यांच्या भांडणात अखिल भारतीय टेनिस असोसिएशननं सानियाला उभं केलं. सानियानं संघटनेवर हल्लाबोल केला. तिच्या कणखर भूमिकेमुळे संघटनेला नमतं घ्यावं लागलं. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धाच्या वेळी सानियासमोर यक्षप्रश्न होता. क्रमवारीच्या गुणांसाठी अन्य स्पर्धा खेळायच्या की देशासाठी पदक मिळवून देण्यासाठी आशियाई स्पर्धेत खेळायचं, हा निर्णय संघटनेने घ्यावा असं सानियाने ठरवलं. वैयक्तिक हितापेक्षा देशाला महत्त्व देत सानियानं भारताला तीन आशियाई पदकं मिळवून दिली. नव्या तेलंगण राज्याची सदिच्छादूत म्हणून सानियाची नियुक्ती करण्यात आली. पाकिस्तानची सून असलेल्या सानियाला सदिच्छादूत करण्याच्या हेतूवरच याच राज्याचे भाजप नेते के. लक्ष्मण यांनी आक्षेप नोंदवला. दुखावलेल्या सानियाने मुलाखती, ट्विटरच्या माध्यमातून मी शेवटच्या क्षणापर्यंत भारतीयच असल्याचे सांगितले. सातत्याने वादांची राळ उडत असताना विचलित न होता आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाच्या खेळाडूंना टक्कर देत सातत्याने खेळणं हेच आव्हानात्मक आहे. गेली वीसहून अधिक वर्षे सानिया खेळतेय आणि जिंकते आहे. एकेरी खेळणं प्रतिष्ठेचं असतं. पण सानियाला हायपरलॅक्सिटी नावाचा आजार आहे, ज्यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. या आजारामुळे दुखापती होण्याची शक्यता वाढते. सानियाच्या दोन्ही गुडघे आणि मनगटावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन सानियाने फक्त दुहेरी खेळण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयाने तिच्या कारकीर्दीला संजीवनी मिळाली. सुखवस्तू घर एवढी पुंजी घेऊन सानियाने टेनिस खेळायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंकडे प्रशिक्षक-सहयोगींचा ताफा असतो. सानियासाठी तिचे वडीलच प्रशिक्षक आहेत. सानियानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल शंभरमध्येही एकही भारतीय टेनिसपटू नाही. त्यामुळे सायनासाठी ‘एकला चलो रे’ हेच सूत्र राहिले. खेळाडू म्हणून नवनवी शिखरं पादाक्रांत करत असताना जाहिराती, रॅम्पवॉक, छायाचित्रणं, बॉलीवूड मैफली यातही सानिया मनापासून रमते. असंख्य ब्रँड्सशी संलग्न असणाऱ्या सानियाचे ट्विटरवर २.५२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आपल्यानंतर टेनिसविश्वातली पोकळी लक्षात घेऊन, सानियाने अकादमी स्थापन केली आहे. चंगळवादी संस्कृतीची पाईक असलेली खेळाडू या प्रतिमेला छेद देत टेनिसचा ध्यास जोपासणारी आणि त्याच वेळी टेनिसपल्याडचं आयुष्यही समरसून जगणारी सर्वसमावेशक क्रीडापटू असल्याचं सानियाने क्रमवारीतील अव्वल स्थानाद्वारे सिद्ध केलं आहे.