आयसीसीच्या बैठकीत प्रशासन, घटनात्मक सुधारणा आणि आर्थिक संरचना या मुद्द्यांवर बीसीसीआयची नामुष्की झाली असली तरी होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास सर्व सदस्य तयार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले. आयसीसीच्या आर्थिक संरचनेत बदल करण्यास बीसीसीआय वगळता इतर सर्व सदस्य संघटनांनी तयारी दाखवली आली. त्यामुळे नाराज झालेल्या बीसीसीआयकडून यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर बहिष्कार टाकला जाण्याची दाट शक्यता आहे.

दुबईत झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयच्या बाजूने केवळ श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मतदान केले, उर्वरित सदस्य संघटनांनी आयसीसीमधील बदलांना सहमती दर्शवली.

 

”भारताची एकंदर भूमिका लक्षात घेता त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तरी त्याचा स्पर्धेवर परिणाम होईल असं वाटत नाही. भारताच्या सहभागाशिवायही सर्व सदस्य संघ स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहेत. भारतीय संघाने बहिष्कार टाकलाच तर त्याऐवजी वेस्ट इंडिज किंवा इतर संघाला स्पर्धेसाठी संधी देण्यात येईल.”, असे शहरयार खान म्हणाले.

भारताच्या बहिष्कारामुळे आयसीसीच्या कमाईवर होणाऱ्या परिणामांबाबत बोलताना शहरयार म्हणाले की, भारत स्पर्धेत खेळला नाही, तर आयसीसीला कदाचित तोटा होईल, पण त्यासाठी इतर सदस्य संघांनी तयारी दाखवली आहे. त्यामुळे स्पर्धेवर बहिष्कार टाकून आयसीसीवर दबाव निर्माण करण्याची खेळी यशस्वी होणार नाही.