दोन हंगामांच्या अंतरानंतर पुन्हा रणजी करंडक विजेतेपद जिंकण्यासाठी यजमान मुंबई उत्सुक आहे. वानखेडे स्टेडियमवर २६ ते ३० जानेवारी या कालावधीत होणाऱ्या सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी मुंबईने उपांत्य फेरीचाच संघ कायम ठेवला आहे.
सध्या भारतीय संघातून इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळणारे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि मधल्या फळीतील फलंदाज रोहित शर्मा रणजी स्पध्रेसाठी उपलब्ध होतील, अशी मुंबईला आशा होती. परंतु ती आता मावळली आहे.
‘‘पालम मैदानावर सेनादलाविरुद्ध उपांत्य सामन्यात खेळलेला संघच मुंबईने कायम ठेवला आहे. रहाणे आणि रोहित या सामन्यासाठी उपलब्ध नसतील,’’ अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली. वेगवान गोलंदाज झहीर खानसुद्धा दुखापतीतून अद्याप सावरलेला नसल्याने अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नसेल.
नवी मुंबईमधील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या गुजरातविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात झहीरच्या पायाला दुखापत झाली होती. पुन्हा सज्ज होण्यासाठी सध्या तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे.
‘‘अंतिम सामन्यासाठी वानखेडेचे द्वार क्रमांक २ आणि ६वर सकाळी ८ वाजल्यापासून तिकिटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नॉर्थ स्टँड आणि विजय र्मचट पॅव्हेलियनकरिता ५० रुपये तर गरवारे पॅव्हेलियनसाठी १५०रुपये तिकिटांचे दर ठेवण्यात आले आहेत,’’ अशी माहिती दलाल यांनी दिली.
संघ : अजित आगरकर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वासिम जाफर, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, अभिषेक नायर, हिकेन शाह, आदित्य तरे, अंकित चव्हाण, निखिल पाटील (ज्यु.), जावेद खान, सुशांत मराठे, शार्दुल ठाकूर आणि विशाल दाभोळकर, प्रशिक्षक – सुलक्षण कुलकर्णी.