भारतीय टेनिसपटू व अखिल भारतीय टेनिस महासंघ यांच्यातील तिढा अद्यापही कायम राहिला आहे. महासंघाने दिलेला प्रस्ताव खेळाडूंनी अमान्य केला असून आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे.
सोमदेव देववर्मन याच्या नेतृत्वाखाली भारताच्या आठ खेळाडूंनी महासंघाविरुद्ध दंड थोपटले आहेत. प्रशिक्षक, कर्णधार बदलण्याच्या मागणीबरोबरच मानधनातही वाढ करण्याची त्यांनी मागणी केली होती. याबाबत महासंघाने रविवारी खेळाडूंपुढे तडजोडीचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र खेळाडूंनी ही तडजोड नाकारली आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी डेव्हिस लढतीवर बहिष्कार घालण्याची त्यांनी धमकी दिली आहे. आपण दिलेला प्रस्ताव योग्य असून त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे महासंघाने कळविले आहे.