भारताचे माजी फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांचा सवाल

कर्णधार विराट कोहलीला आपणच भारतीय क्रिकेटचे सर्वेसर्वा आहे असे वाटत असेल तर प्रशिक्षकाची आवश्यकताच काय, असा सवाल माजी ऑफ-स्पिनर इरापल्ली प्रसन्ना यांनी केला आहे.

कोहली-कुंबळे वादाच्या पाश्र्वभूमीवर प्रशिक्षकाला पद सोडावे लागले, यासंदर्भात भाष्य करताना प्रसन्ना म्हणाले, ‘‘फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकांचीही भारतीय संघाला आवश्यकता नाही. कोहली उत्तम खेळाडू आहे, याविषयी शंकाच नाही. मात्र तो चांगला कर्णधार आहे की नाही, हे मला माहीत नाही.’’

भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. याविषयी प्रसन्ना म्हणाले, ‘‘अनिल कुंबळेसारख्या महान क्रिकेटपटूचा जर आदर केला जात नसेल, तर संजय बांगर आणि आर. श्रीधर यांचासुद्धा होणे कठीण आहे. भारतीय संघाला तंदुरुस्तीच्या सरावासाठी एखादी व्यक्ती नेमली तरी पुरेसी आहे. कर्णधाराची जर अशी प्रवृत्ती असेल, तर प्रशिक्षकाची अजिबात गरज नाही.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘कोहली जर संघाची सर्वस्वी जबाबदारी सांभाळत असेल, तर पूर्वीप्रमाणेच एक व्यवस्थापक संघासोबत द्यावा. कारण प्रशिक्षकाची भूमिकाच स्पष्ट झालेली नाही.’’२०१९च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांचे भारतीय संघात स्थान असेल का, असे विचारले असता प्रसन्ना यांनी राहुल द्रविडप्रमाणे नकार दिला.