श्रीलंकेच्या दौऱ्यात पाच गोलंदाजांनिशी खेळणार असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले असल्यामुळे संघात सहा फलंदाज असतील. त्यामुळे फलंदाजांवर अधिक दडपण असेल, असे वाटत असले तरी सलामीवीर मुरली विजयला मात्र तसे वाटत नाही. श्रीलंकेच्या दौऱ्यात फलंदाजांवर अतिरिक्त दडपण नसेल, असे मत विजयने व्यक्त केले.
‘‘ फलंदाजांवर अधिक दडपण असण्याची गरज नाही. कारण कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आमच्यापैकी एक फलंदाज जरी जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरून राहिला तर नक्कीच आम्ही सुस्थितीत पोहोचू शकतो. आमच्यासाठी हे एक आव्हान असेल, पण ही गोष्ट अशक्यप्राय नक्कीच नाही,’’ असे विजय म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘सामना खेळताना आमच्या खांद्यावर नेहमीच जबाबदारी असते आणि ते असणे गरजेचेदेखील असते. जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला एक संघ म्हणून चांगली कामगिरी करावी लागते. तुमच्याकडे रणनीती असायला हवी आणि त्या रणनीतीची योग्य अंमलबजावणीही व्हायला हवी.’’
या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा निवृत्त होणार आहे, याबद्दल विजय म्हणाला की, ‘‘ महेला जयवर्धने यापूर्वीच निवृत्त झाला आहे आणि आता संगकाराही निवृत्त होणार असून श्रीलंकेसाठी ही न भरून निघणारी पोकळी असेल. कारण गेली बरीच वर्षे या दोघांनीही श्रीलंकेला बरेच विजय मिळवून दिले आहेत. पण श्रीलंकेकडे कर्णधार अँजेलो मॅथ्यूज लहिरु थिरीमानेसारखे युवा गुणवान क्रिकेटपटू आहेत. आता त्यांच्यावर साऱ्यांच्या नजरा खिळलेल्या असतील.’’