दिल्ली न्यायालयाने २०१३च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी निकाल देताना शनिवारी क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांची निर्दोष मुक्तता केली. गुन्हेगारी संघटनांशी या क्रिकेटपटूंचे घनिष्ठ संबंध असल्याचा कोणताही सकृद्दर्शनी पुरावा नसल्यामुळे त्यांना निर्दोष ठरवण्यात आल्याचे या निकालात अधोरेखित करण्यात आले आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना कृष्णा बन्सल यांनी आपल्या १७५ पानी निकालपत्रात म्हटले आहे की, आरोपींवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अनुसार कारवाई करण्यासंदर्भात या खटल्यात कोणतेही सकृद्दर्शनी पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वी आयपीएलचा सहावा हंगाम चालू असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे तीन क्रिकेटपटू जेरबंद करण्यात आले. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्वरित कारवाई करून या तिघांवर आजीवन बंदी घातली होती.
श्रीशांत तसेच त्याचे दोन मित्र अभिषेक शुक्ला आणि जिजू जनार्दन यांच्यावरील आरोपांबाबत न्यायाधीशांनी म्हटले आहे की, या तिघांविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याने ‘मकोका’ लावता येत नाही. गुन्हेगारी संघटनांशी संबंध असल्याचे सिद्ध होत नाही. उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार सट्टेबाज चंद्रेश पटेलच्या सांगण्यानुसार जनार्दनने श्रीशांतकडे एक निश्चित केलेले षटक टाकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु त्याने तो प्रस्ताव झिडकारला होता.
जनार्दन आणि चंद्रेश पटेल यांच्या संभाषणाबाबत न्यायालयाने म्हटले की, बऱ्याच कालावधीनंतर श्रीशांत मैदानावर परतला होता, त्यामुळे ते षटक निश्चित करण्याची अजिबात इच्छा नव्हती. हा धोका त्याला पत्करायचा नव्हता.
अजित चंडिलाबाबत न्यायालयाने म्हटले आहे की, त्याने खराब कामगिरी करण्याचे मान्य केले होते; परंतु प्रत्यक्षात त्याने तसे केले नाही. पैसे घेतल्यानंतर त्याने कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे सिद्ध होत आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील संघटितपणे सट्टेबाजीवर नियंत्रण करीत असल्याची माहिती चंडिलाला नव्हती, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
अंकित चव्हाणने आपल्या क्षमतेला न्याय न देणारी खराब कामगिरी केल्याचे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. राजस्थान रॉयल्सचा तत्कालीन कर्णधार राहुल द्रविड आणि अन्य साक्षीदारांच्या जबानीनुसार अंकितने खराब कामगिरी केल्याचे निष्पन्न होत नाही. भारतीय दंड संहितेच्या कलम ४१५नुसार अंकितने फसवणूक केल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे कोणताही सकृद्दर्शनी पुरावा त्याच्याविरोधात सापडत नाही.
पोलिसांनी या ४२ आरोपींविरोधात सहा हजार पानी आरोपपत्र दाखल केले होते. भारतीय दंड संहिता १२०-ब, ४१९, ४२० आणि ‘मकोका’नुसार यांच्यावर कट रचणे, फसवणूक आणि संघटित गुन्हेगारीशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते.