खेळाडूंनी सर्वोत्तम खेळ करावा आणि फक्त विजय मिळवून द्यावा, अशीच बहुतांशी अपेक्षा असते; पण या अपेक्षा करत असताना त्यांना आपण मूलभूत सुविधा तरी देत आहोत का, असा सवाल केला तर त्याचे उत्तर नकारार्थीच आहे. काही वर्षांपासून महिलांसाठीची ‘राइट टू पी’ मोहीम सुरू आहे. आता अशीच मोहीम खेळाडूंसाठीही सुरू करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील मैदानांवर महिलांसाठी तर सोडाच, पुरुषांनाही सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या सुविधा मिळत नाहीत. आझाद, ओव्हल आणि शिवाजी पार्क यांसारख्या मोठय़ा मैदानांमधील ही परिस्थिती आपल्या खेळाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरच भाष्य करणारी आहे. या असुविधांच्या मैदानांवर एक दृष्टिक्षेप..
आझाद मैदान. मुंबईतील ऐतिहासिक मैदानांपैकी एक. या मैदानात एका वेळी २२ खेळपट्टय़ांवर क्रिकेटचे सामने रंगतात. म्हणजे २२ सामन्यांसाठी ४४ संघ, प्रत्येक संघात १५ खेळाडू, ४४ पंच आणि गुणलेखक आदी मंडळी येथे एकाच वेळी उपस्थित असतात. त्यात भर प्रेक्षकांची. या सर्वासाठी मैदानावर स्वच्छतागृह आणि अन्य सुविधा असणे आवश्यकच. परंतु त्याचे कसल्याही प्रकारचे गांभीर्य कोणत्याही प्रशासनाला वाटत नाही.
मैदानाच्या बाहेर दोन स्वच्छतागृहे आहेत. एक महानगरपालिकेच्या समोर, तर दुसरे फॅशन स्ट्रीटच्या समोर; पण या दोन्ही ठिकाणी मोठी वर्दळ असल्याने खेळाशी निगडित व्यक्तींना तेथे गेल्यावर बराच काळ ताटकळावे लागते. आझाद मैदानामध्ये काही वर्षांपूर्वी ससानियन क्लबने खेळाशी निगडित व्यक्तींसाठी शौचालय बांधून घेतले होते; पण काही वर्षांपूर्वी महापालिकेनेच ते तोडले. अशा वेळी पुरूष खेळाडू सरळ कुठलासा आडोसा पाहतात. ते चूक आहे, हे त्यांनाही कळते. पण दुसरा पर्यायच त्यांच्यासमोर नाही.  
आझाद मैदानावर महिला खेळाडूंसाठीच्या सुविधांची अवस्था तर विदारकच म्हणावी लागेल. मुळात तेथे महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही. पुरुषांच्या स्वच्छतागृहाचा वापर त्यांना करावा लागतो. त्यांना कपडे बदलण्यासाठीसुद्धा कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मोठय़ा मैदानाची अशी ही खोटी लक्षणे. पण त्याकडे पाहण्यास कोणालाच वेळ नाही, ही या खेळाडूंची खंत आहे.
*दिवसाचे सरासरी सामने : २२   * सरासरी उपस्थिती : किमान ८०० व्यक्ती.
स्वच्छतागृह हा मोठा प्रश्न असून त्यासाठी कोणीही काहीही करत नाही. काही वर्षांपूर्वी आम्ही शौचालय बांधले होते; पण महानगरपालिकेने ते तोडले, पण त्या बदल्यात कोणतीच व्यवस्था केलेली नाही. काही वेळेला खेळाडूंना किंवा खेळाशी निगडित व्यक्तींना टॅक्सी पकडून चर्चगेट स्टेशन किंवा घर गाठण्याशिवाय पर्याय नसतो. महिला क्रिकेटपटू आणि गुणलेखकांसाठी कोणतीच सुविधा नाही. दिवसभर सामना चालतो, त्यामुळे त्यांची गैरसोय होते. या गोष्टीकडे कुणीच लक्ष देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेच्या बाबतीत बोलतात; पण सरकार, महानगरपालिका काहीच सोयी देत नाही. आता आम्ही मोदींकडे जाऊन दाद मागायची का?
-लक्ष्मण चौहान, ससानियन क्लबचे प्रशिक्षक

आझाद मैदानात एवढे क्लब्ज आहेत; पण महिलांसाठी कोणतीच सुविधा एकाही क्लबमध्ये नाही. त्यामुळे महिला क्रिकेटपटूंबरोबरच महिला गुणलेखकांचीही गैरसोय होते. पुरुषांच्या स्वच्छतागृहामध्ये महिलांना जावे लागते, कारण पर्यायच नसतो. मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे (एमएसएसए) कार्यालय  खुले असेल तर तिथे जाता येते. त्याचबरोबर महिलांसाठी ड्रेसिंग रूम नाहीत. साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. जर अशाच असुविधा असतील, तर सारेच कठीण होऊन जाते.
-सुरेखा भंडारी, माजी महिला क्रिकेटपटू

आझाद मैदान हे ऐतिहासिक वास्तूंच्या यादीमध्ये येते, त्यामुळे या मैदानामध्ये कोणतेही पक्के बांधकाम करता येऊ शकत नाही. पण आम्ही या मैदानांतील गैरसोयींसाठी फिरत्या शौचालयाचा विचार करत आहोत, त्यासाठी आमचे प्रयत्नही सुरू आहेत. ससानियन क्लबने आमच्याकडे शौचालयाची मागणी करणारे पत्र दिले आहे आणि आम्ही ते सरकार आणि पालिकेकडे पाठवले आहे. गैरसोय होत असली तरी त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
-आनंद व्यंकटेश्वरन, क्रीडा उपसंचालक