सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मदानावरची खेळपट्टी ही अधिकाधिक धोकादायक सिद्ध होऊ लागली आहे. पावसाच्या सावटाखालील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळावर गोलंदाजांचेच वर्चस्व होते. एकंदर १५ फलंदाज रविवारी बाद झाले. वरुणराजाने मेहेरनजर राखली, तर ही अखेरची कसोटी निर्णायक ठरण्याचे संकेत मात्र मिळत आहेत. भारताने पहिल्या डावात १११ धावांची आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. परंतु दिवसअखेर दुसऱ्या डावात तीन फलंदाज लवकर तंबूत परतल्यामुळे भारताचा हा आनंद क्षणभंगूर ठरला.
तिसऱ्या कसोटीने रविवारी अतिशय नाटय़मय रंग दाखवले. वर्चस्वाच्या लढाईत एका संघाकडून दुसऱ्या संघाकडे पारडे झुकत होते. भारतीय संघ मोठी आघाडी घेण्याची चिन्हे दिसत होती. परंतु पदार्पणवीर कुशल परेरा (५५) आणि रंगना हेराथ (४९) यांच्या झुंजार प्रतिकारामुळे भारताची आघाडी मर्यादित राहिली. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताची ३ बाद २१ अशी केविलवाणी अवस्था करून संघाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पावसाच्या आगमनामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला, तेव्हा कर्णधार विराट कोहली (१) आणि रोहित शर्मा (१४) मैदानावर होते.
भारताकडे आता एकंदर १३२ धावांची आघाडी असून, अद्याप सात फलंदाज बाकी आहेत. उर्वरित दोन दिवसांत कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.
त्याआधी, ८ बाद २९२ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे प्रारंभ करणाऱ्या भारताचा पहिला डाव सकाळी ३१२ धावांत आटोपला. चेतेश्वर पुजारा १४५ धावांवर नाबाद राहिला. संपूर्ण डाव नाबाद राहण्याची किमया साधणारा पुजारा सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्यानंतर चौथा फलंदाज ठरला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसादने १०० धावांत ४ बळी घेतले, तर डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथने ८४ धावांत ३ बळी घेतले.
मग श्रीलंकेची सुरुवातीला ६ बाद ४७ अशी दयनीय अवस्था भारतीय गोलंदाजांनी केली. परंतु परेरा आणि हेराथने खेळपट्टीवर चिवट झुंज देत सातव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. चहापानानंतर श्रीलंकेचा डाव २०१ धावांत संपुष्टात आला. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने ५४ धावांत ५ बळी घेण्याची किमया साधली. श्रीलंकेच्या भूमीवरील ही भारतीय गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यानंतर भारताची दुसऱ्या डावात खराब सुरुवात झाली. पहिल्या डावातील शतकवीर पुजारा भोपळाही फोडू शकला नाही. प्रसादच्या इनस्विंगने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. मग न्यूवान प्रदीपने लोकेश राहुलचा (२) त्रिफळा उडवला, तर अजिंक्य रहाणेला (४) पायचीत केले आणि भारताची ३ बाद ७ अशी त्रेधातिरपीट उडाली.

धावफलक
भारत (पहिला डाव) : लोकेश राहुल त्रि. गो. प्रसाद २, चेतेश्वर पुजारा नाबाद १४५, अजिंक्य रहाणे पायचीत गो. प्रदीप ८, विराट कोहली झे. परेरा गो. मॅथ्यूज १८, रोहित शर्मा झे. थरंगा गो. प्रसाद २६, स्टुअर्ट बिन्नी पायचीत गो. प्रसाद ०, नमन ओझा झे. थरंगा गो. कौशल २१, रविचंद्रन अश्विन झे. परेरा गो. प्रसाद ५, अमित मिश्रा यष्टीचीत परेरा गो. हेराथ ५९, इशांत शर्मा त्रि. गो. हेराथ ६, उमेश यादव त्रि. गो. हेराथ ४, अवांतर – १८, एकूण १००.१ षटकांत सर्व बाद ३१२. बाद क्रम : १-२, २-१४, ३-६४, ४-११९, ५-११९, ६-१७३, ७-१८०, ८-२८४, ९-२९८, १०-३१२.
गोलंदाजी : धम्मिका प्रसाद २६-४-१००-४, न्यूवान प्रदीप २२-६-५२-१, अँजेलो मॅथ्यूज १३-६-२४-१, रंगना हेराथ २७.१-३-८४-३, थरिंदू कौशल १२-२-४५-१.
श्रीलंका (पहिला डाव) : उपूल थरंगा झे. राहुल गो. इशांत ४, कौशल सिल्व्हा त्रि. गो. यादव ३, दिम्यूत करुणारत्ने झे. राहुल गो. बिन्नी ११, दिनेश चंडिमल पायचीत गो. बिन्नी २३, अँजेलो मॅथ्यूज झे. ओझा गो. इशांत १, लहिरू थिरिमाने झे. राहुल गो. इशांत ०, कुशल परेरा झे. कोहली गो. इशांत ५५, धम्मिका प्रसाद यष्टीचीत ओझा गो. मिश्रा २७, रंगना हेराथ झे. ओझा गो. इशांत ४९, थरिंदू कौशल पायचीत गो. मिश्रा १६, न्यूवान प्रदीप नाबाद २, अवांतर- १०, एकूण ५२.२ षटकांत सर्व बाद २०१.
बाद क्रम : १-११, २-११, ३-४०, ४-४५, ५-४७, ६-४७, ६-४८* (प्रसाद, जखमी निवृत्त), ७-१२७, ८-१५६, ९-१८३, १०-२०१.
गोलंदाजी : इशांत शर्मा १५-२-५४-५, उमेश यादव १३-२-६४-१, स्टुअर्ट बिन्नी ९-३-२४-२, आर. अश्विन ८-१-३३-०, अमित मिश्रा ७.२-१-२५-२.
भारत (दुसरा डाव) : चेतेश्वर पुजारा त्रि. गो. प्रसाद ०, लोकेश राहुल त्रि. गो. प्रदीप २, अजिंक्य रहाणे पायचीत गो. प्रदीप ४, विराट कोहली खेळत आहे १, रोहित शर्मा खेळत आहे १४, एकूण ८.१ षटकांत ३ बाद २१.
बाद क्रम : १-०, २-२, ३-७; गोलंदाजी : धम्मिका प्रसाद ४.१-२-८-१, न्यूवान प्रदीप ३-१-६-२.