नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे आणि या स्पर्धेचे अव्वल मानांकनही त्यांनाच देण्यात आले आहे. आपल्या नावामागे असणाऱ्या लौकिकाला साजेसा ‘अव्वल नंबरी’ खेळ करत या दोघांनीही ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले. अमेरिकेच्या १९ वर्षीय मॅडिसन की हिने व्हीनस विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आणले, तर गतविजेता स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने उपांत्य फेरी गाठत जेतेपदासाठी दावेदारी सिद्ध केली. सानिया मिर्झा आणि लिएण्डर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह खेळताना मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत धडक मारली.
 जोकोव्हिचने उंचपुऱ्या, वेगवान व खोलवर सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध अशा आठव्या मानांकित मिलोस राओनिकवर ७-६ (७-५), ६-४, ६-२ अशी मात केली. अचूक सव्‍‌र्हिस, परतीच्या फटक्यावरचे प्रभुत्व आणि राओनिकच्या कच्च्या दुव्यांचा सखोल अभ्यास हे जोकोव्हिचच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. उपांत्य फेरीत जोकोव्हिचचा मुकाबला गतविजेता स्टॅनिसलॉस वॉवरिन्काशी होणार आहे.
चौथ्या मानांकित वॉवरिन्काने आशियाई खंडाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केई निशिकोरीवर ६-३, ६-४, ७-६ (८-६) असा विजय मिळवत उपांत्य फेरीत आगेकूच केली. टायब्रेकरमध्ये तब्बल पाच मॅचपॉइंट गमावल्यानंतर वॉवरिन्काला हा विजय मिळवता आला.
महिलांमध्ये जेतेपदाची दावेदार सेरेना विल्यम्सने डॉमिनिका सिबुलकोव्हाचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. ३३ वर्षीय सेरेनाने १५ बिनतोड सव्‍‌र्हिसच्या आधारे सिबुलकोव्हाला निष्प्रभ केले. या विजयासह सेरेनाने २६व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होण्याचा मान पटकावला. उपांत्य फेरीत सेरेनाची लढत अमेरिकेच्याच युवा मॅडिसन की हिच्याशी होणार आहे.
बिगरमानांकित १९ वर्षीय मॅडिसनने अनुभवी व्हीनस विल्यम्सवर ६-३, ४-६, ६-४ अशी मात करत सनसनाटी विजय मिळवला. लिंडसे डेव्हनपोर्टच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मॅडिसनने दुखापतीने त्रस्त केलेले असतानाही चिवटपणे खेळ करत विजय साकारला.

सानिया, पेस मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत
अव्वल मानांकित सानिया मिर्झा-ब्रुनो सोरेस जोडीने कॅसे डेलाअ‍ॅक्वा-जॉन पीअर्स जोडीवर ६-२, ६-२ असा सहज विजय मिळवत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले. पहिला सेट २३, तर दुसरा सेट ३० मिनिटांत नावावर करत सानिया-ब्रुनो जोडीने हा विजय साकारला. भारताचा अनुभवी लिएण्डर पेसने मार्टिना हिंगीसच्या साथीने खेळताना आंद्रेआ लाव्हाकोव्हा-अलेक्झांडर पेया जोडीवर ६-३, ६-१ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेतील आतापर्यंतचा हा माझा सर्वोत्तम सामना होता. या विजयामुळे आत्मविश्वास दुणावला आहे. वॉवरिन्काविरुद्धच्या लढतीसाठी मी सज्ज झालो आहे.
-नोव्हाक जोकोव्हिच  

मी चांगला खेळ केला, म्हणूनच जिंकू शकले. सिबुलकोव्हा सातत्याने चांगली खेळत आहे, माझी कामगिरी जराही खालावली असती तर मला पराभवाला सामोरे जावे लागले असते. या विजयाने जेतेपदासाठी प्रेरणा मिळाली आहे.
– सेरेना विल्यम्स