गतविजेत्या नोव्हान जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पध्रेचे जेतेपद राखण्याच्या दृष्टीने दणक्यात सुरुवात केली. त्याने जर्मनीच्या फिलीप कोहलस्क्रेबरचा दोन तास ३ मिनिटांच्या लढतीत ६-४, ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिऑस, मॅरिन सिलीक यांनी, तर महिला गटात मारिया शारापोव्हा, सेरेना विलियम्स आणि अ‍ॅना इव्हानोव्हिक यांनीही आगेकूच केली.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपदाच्या उंबरठय़ावरून मागे फिरावे लागल्याने आलेली निराशा झटकून जोकोव्हिचने अप्रतिम खेळ केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना जोकोव्हिचने सामन्यावर पकड घेतली होती. मात्र, फिलीपनेही कडवा संघर्ष दाखवत जोकोव्हिचला विजयासाठी ताटकळत ठेवले. जोकोव्हिचने २० अनफोर्स एरर केले, परंतु त्याने तिन्ही सेटमध्ये फिलिपची सव्‍‌र्हिस ब्रेक करून बाजी मारली.
पुरुष गटाच्या दुसऱ्या लढतीत किर्गिओसने अर्जेटिनाच्या डिएगो श्व्ॉर्टज्मनचा ६-०, ६-२, ७-६ (८-६) असा पराभव करून आगेकूच केली. पहिले दोन्ही सेट सहज जिंकणाऱ्या किर्गिओसला तिसऱ्या सेटमध्ये डिएगोने झुंजवले. टाय ब्रेकरमध्ये झालेल्या या सेटमध्ये किर्गिओसने बाजी मारली. ही लढत एक तास २५ मिनिटे चालली. क्रोएशियाच्या सिलिकनेही जपानच्या हिरोकी मोरियावर ६-३, ६-२, ७-६ (७-४) असा विजय साजरा केला.
महिला गटात फार चुरस पाहायला मिळाली नाही. शारापोव्हा, सेरेना, इव्हानोव्हिक, विक्टोरिआ अझारेंका आणि समांथा स्तोसुर यांनी सहज विजय मिळवले. रशियाची दिग्गज खेळाडू शारापोव्हाने ब्रिटनच्या जोहाना कोंटाचा ६-२, ६-२ असा अवघ्या १ तास २२ मिनिटांत पराभव केला. अमेरिकेच्या सेरेनानेही १ तास २२ मिनिटांच्या खेळात रशियाच्या मार्गारिटा गास्पार्यानवर ६-४, ६-१ असा विजय मिळवला. सर्बियाच्या इव्हानोव्हिकने १ तास १ मिनिटात चीनच्या यी फॅन झ्युवर ६-१, ६-१ असा सोपा विजय साजरा केला. बेलारुसची अझारेंका आणि ऑस्ट्रेलियाच्या स्तोस्तूर यांनी अनुक्रमे इस्टोनिआच्या अ‍ॅनेट कोंटावेटवर  ६-२, ६-१ असा आणि माँटेनेग्रोच्या डॅन्का कोव्हिनिकवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला.

आमच्या क्रीडा प्रकारात विम्बल्डनहून मोठी स्पर्धा असूच शकत नाही. येथे खेळण्याचा आनंद निराळाच आहे. येथे येणे आणि जेतेपद कायम राखण्यात यश मिळवणे, ही बाब किती सुखद आहे, हे शब्दात सांगणे कठीण आहे. ग्रास कोर्टवर फिलिपने चांगली लढत दिली. आशा करतो की, आजच्या सामन्याप्रमाणे संपूर्ण स्पध्रेत  सातत्य राखण्यात यशस्वी होईन.
– नोव्हाक जोकोव्हिच