सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

ऑलिम्पिकपटू आणि कसोटीपटूंचा समावेश असलेल्या निवृत्त खेळाडूंच्या एका गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून लोढा समितीच्या सुधारणा शिफारशी सर्व खेळांत लागू कराव्यात, अशी मागणी केली आहे.

माजी न्यायमूर्ती लोढा यांच्या समितीने भारतीय क्रिकेट प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी शिफारशी केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालय पुढील आठवडय़ात या शिफारशींबाबत अंतिम आदेश जारी करणार आहे. या पाश्र्वभूमीवर ही जनहित याचिका करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांमध्ये अशोक कुमार ध्यानचंद, एम. के. कौशिक, ज्वाला गट्टा, अश्विनी नाचप्पा, एडवर्ड सिक्वेरा, जी. ई. श्रीधरन, रीथ अब्राहम, गुरबक्ष सिंग ग्रेवाल, बलबिर सिंग, फोर्टुनॅटो फ्रँको, एस. एस. नारायण, जोआकिम काव्‍‌र्हालो, वंदना राव, प्रवीण ठिपसे, भाग्यश्री ठिपसे, माया मेहेर, निशा मिलेट, अलॉयसिस एडवर्ड्स, मधू यादव, कीर्ती आझाद, बिशन सिंग बेदी, समीर बहादूर, के. पी. एस. गिल, अशोक माथुर आणि वीरेंद्र कुमार अशा २८ खेळाडूंचा समावेश आहे.

‘‘लोढा समितीने केलेल्या शिफारशींपैकी काही नियम हे राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेमध्ये आढळतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वगळता बाकी सर्व क्रीडा संघटना या केंद्र सरकारशी बांधील असतात. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सर्व खेळांमध्ये करण्यासंदर्भात केंद्र सरकारचे क्रीडा मंत्रालय आदेश जारी करू शकते,’’ असे पुढे म्हटले आहे.