नेदरलँड्सकडून दारुण पराभव झाल्यानंतरही भारतीय महिला संघाच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा कायम राहिल्या आहेत, मात्र त्यासाठी त्यांना जागतिक हॉकी लीगमध्ये इटलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारताला ‘प्ले-ऑफ’ सामन्यांमध्ये ५ ते ८ क्रमांकासाठी खेळावे लागणार आहे. भारताच्या तुलनेत इटलीचा संघ कमकुवत असून त्यांना उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाने हरवले होते.
नेदरलँड्सविरुद्ध दणदणीत पराभवानंतर भारताला आजच्या लढतीत सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे. नेदरलँड्सचा संघ ऑलिम्पिक व विश्वविजेता संघ असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारताचा पराभव हे स्पष्टच होते, तरीही या पराभवामुळे खेळाडूंवर खूप मानसिक दडपण आले आहे. हे नैराश्य दूर करीतच त्यांना खेळावे लागणार आहे. भारताला जागतिक क्रमवारीत १३वे स्थान आहे, तर इटली १६व्या क्रमांकावर आहे. इटलीच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगली लढत दिली होती. साहजिकच भारताला त्यांच्याविरुद्ध शेवटपर्यंत उत्कृष्ट खेळ करावा लागणार आहे.
सामन्याची वेळ : दु. ४.३० वा. पासून
सामन्याची वेळ : स्टार स्पोर्ट्स-१ वर.