सचिन तेंडुलकर आणि ए. आर. रेहमान यांना ‘आयओए’चे निमंत्रण

रिओ ऑलिम्पिकसाठीच्या भारतीय चमूचा सदिच्छादूत म्हणून बॉलीवूड अभिनेता सलमान खानची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असताना भारतीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात पहिले आणि एकमेव सुवर्णपदकप्राप्त नेमबाज अभिनव बिंद्राची सदिच्छादूतपदी नियुक्ती केली. बिंद्रासह महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या सदिच्छादूतपदी नियुक्तीसाठी आयओए प्रयत्नशील आहे.

‘‘सदिच्छादूत म्हणून काम करण्यासाठी आयओएचे निमंत्रण मिळाले आणि त्यांना तात्काळ होकार दिला. या भूमिकेला मी न्याय देऊ शकेन हे आयओएला वाटणे, हा माझा सन्मान आहे. विनम्र भावनेने मी या भूमिकेचा स्वीकार करत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मी आयुष्यभर कार्यरत आहे. देशातल्या ऑलिम्पिक चळवळीला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी योगदान देत आहे. रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशवासीयांना अभिमानास्पद वाटेल असे प्रदर्शन करणे माझे लक्ष्य आहे. ते कायमच असेल पण आता माझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे. भारतीय खेळाडूंना कोणत्याही स्वरूपाची मदत लागली तर मी उपलब्ध असेन. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक भारतीय क्रीडापटूला वैयक्तिक पत्र लिहून संदेश देण्याचा विचार आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा प्रत्येक भारतीय क्रीडापटू विजेताच आहे. ऑलिम्पिकवारीचा माझा अनुभव त्यांना उपयुक्त ठरला तर आनंदच होईल. १५ जुलैपर्यंत सदिच्छादूत म्हणून काम करेन. नंतर सरावावर लक्ष केंद्रित करेन,’’ असे अभिनवने सांगितले.

दरम्यान, सचिन आणि रेहमान यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची आयओएला प्रतीक्षा आहे. सलमान खानच्या सदिच्छादूतपदी नियुक्तीनंतर कुस्तीपटू योगेश्वर दत्त तसेच ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी नाराजी व्यक्त केली होती.