भारतास नेमबाजीत ऑलिम्पिक रौप्य व कांस्यपदक मिळवून देणाऱ्या गन फॉर ग्लोरी नेमबाजी अकादमीतील ऑलिम्पिकपटू व आंतरराष्ट्रीय नेमबाजांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. या अकादमीबरोबर शासनाने केलेला पाच वर्षांचा करार रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
या अकादमीचे संचालक पवनकुमारसिंग यांनी सांगितले, राज्य शासनाने २०११ मध्ये आमच्याशी पाच वर्षांचा करार केला होता. त्यानुसार शिवछत्रपती क्रीडानगरीतील विविध नेमबाजी सुविधांचा उपयोग या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना देण्याचा करार करण्यात आला होता. वार्षिक ५ लाख ३९ हजार रुपये भाडे ठरविण्यात आले होते. दरवर्षी त्यामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा शासनास हक्क देण्यात आला होता. हा करार आणखी दोन वर्षांनी संपत असला तरी राज्य शासनाने एक जानेवारी २०१३ रोजी अकादमीस पत्र पाठवित हा करार रद्द करण्यात आल्याचे कळविले आहे.
 आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐंशीहून अधिक पदकांची लयलूट येथील खेळाडूंनी केली आहे. या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या गगन नारंग याने लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले, तर त्याचा सहकारी विजयकुमार याने रौप्यपदक जिंकले. अन्य काही खेळाडूंनी आतापर्यंत जागतिक स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करताना विश्वविक्रमही नोंदविले आहेत. २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेकरिता या अकादमीत भारताचे संभाव्य पदक विजेते अनेक खेळाडू नियमित सराव करीत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील अव्वल दर्जाचे खेळाडू परदेशी प्रशिक्षकांमार्फत येथे प्रशिक्षण घेत आहेत. भारतीय रायफल नेमबाजी संघटनेतर्फेही येथे भारतीय संघाचे सराव शिबिर घेतले जाते. शासनाने एक एप्रिल २०१३ पासून या अकादमीबरोबर केलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या सर्व खेळाडूंचे भवितव्य अंधारमय झाले आहे.

खेळाडूंचे नुकसान होणार नाही -टेकाळे
याबाबत शिवछत्रपती क्रीडापीठाचे उपसंचालक जनक टेकाळे यांना विचारले असता ते म्हणाले, क्रीडाआयुक्त पंकजकुमार यांनी हा करार रद्द करण्याचा आदेश दिला आहे मात्र हा आदेश केवळ शासकीय प्रक्रियेचा भाग असून अकादमीस एक एप्रिल २०१३ पासून पुन्हा नेमबाजीचा सराव करण्याची सवलत दिली जाईल. क्रीडामंत्र्यांबरोबर पंकजकुमार यांची चर्चा झाली असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल.