खेळाची लोकप्रियता कशी वाढावी, प्रायोजक कसे मिळवावेत, याबाबत ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील संघटकांनी क्रिकेट संघटकांपासून बोध घेतला पाहिजे, असे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने सांगितले.
‘ध्येय ऑलिम्पिक पदक मिळविण्याचे’ या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत येथे सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या समितीचे सदस्य म्हणून द्रविड हे काम करीत आहेत. या समितीत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद, ज्येष्ठ अ‍ॅथलेट अंजू बॉबी जॉर्ज, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोम, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांचाही समावेश आहे. २०१६ व २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने भरघोस पदके मिळविण्याच्या हेतूने ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीच्या बैठकीनंतर द्रविड म्हणाला ‘‘अन्य खेळांतील खेळाडू जागतिक स्तरावर अतिशय उच्च कौशल्य दाखवित पदक मिळवित असतात. क्रिकेटपटूंनीही त्यांच्यापासून आदर्श घेतला पाहिजे. सर्वच क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी एकमेकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण केली पाहिजे. प्रत्येक खेळाचे वैशिष्टय़ असते आणि खेळाडूही मुलखावेगळी कामगिरी करीत भारताचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असतात.’’
‘‘मी क्रिकेटपटू असल्यामुळे प्रथम मला या सुकाणू समितीत घेतल्यानंतर आश्चर्य वाटले. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये यश कसे मिळवायचे असते, हे मी माझ्या दीर्घकालीन अनुभवाद्वारे शिकलो आहे. त्यामुळेच मला या समितीत घेतले असावे असे मी मानतो. परंतु नेमबाजी, बॅडमिंटन किंवा अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक मिळविण्यासाठी नेमके कोणते तंत्रज्ञान पाहिजे, हे मला सांगता येणार नाही. मात्र खेळात सर्वोच्च यश मिळविण्यासाठी जिद्द, निष्ठा, आत्मविश्वास, संयम आदी गोष्टी कशा आचरणात आणाव्यात हे मी नक्की सांगू शकेन,’’ असेही द्रविडने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘क्रिकेटबरोबरच अन्य खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी लक्षणीय प्रगती केली आहे. ऑलिम्पिकमध्ये आता पदके मिळायला लागली आहेत. मात्र आपल्यापेक्षा आकाराने लहान असलेले देश ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करत असतात. त्यांच्याप्रमाणेच भारतीय खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली पाहिजे.’’ भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे उपाध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर हे या वेळी उपस्थित होते.