पहिल्या डावातील ९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर तामिळनाडू संघाने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला़  तामिळनाडूच्या पहिल्या डावातील ५४९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा डाव ४५४ धावांत आटोपला. तामिळनाडूची अंतिम फेरीत गतविजेत्या कर्नाटक संघाशी गाठ पडणार आहे. हा सामना मुंबई येथे ८ ते १२ मार्च या कालावधीत होणार आहे.
ईडन गार्डन्स येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने ५ बाद ३९४ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्या वेळी अंकित बावणे व कर्णधार रोहित मोटवानी ही जोडी खेळत होती. ही जोडी फुटली आणि महाराष्ट्राने शेवटचे पाच फलंदाज अवघ्या ६० धावांत गमावले.  बावणे व मोटवानी यांच्यावर महाराष्ट्राच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र मोटवानी याला ११ धावांवर बाद करीत विजय शंकर याने तामिळनाडूच्या मार्गातील अडसर दूर केला. तेथूनच महाराष्ट्राच्या डावाची घसरगुंडी झाली. पाठोपाठ त्यांनी बावणे तंबूत परतला. बावणे याने १० चौकारांसह ५७ धावा केल्या. श्रीकांत मुंढे (नाबाद २५) व अनुपम संकलेचा (१७) यांच्या आक्रमक खेळामुळे महाराष्ट्रने साडेचारशे धावांचा पल्ला ओलांडला हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. संकलेचा याच्यापाठोपाठ आलेल्या डॉमिनिक जोसेफ व समाद फल्लाह यांना भोपळाही फोडता आला नाही. महाराष्ट्राचा डाव १४२ षटकांत ४५४ धावांमध्ये आटोपला. तामिळनाडूकडून अश्विन क्रिस्ट याने सर्वाधिक चार बळी घेतले. अभिनव मुकुंद व बाबा अपराजित यांनी दुसऱ्या डावात तामिळनाडूसाठी ११९ धावांची नाबाद भागीदारी केली.
 
संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू : (पहिला डाव) ५४९ व (दुसरा डाव) बिनबाद ११९ (अभिनव मुकुंद नाबाद ६६, बाबा अपराजित नाबाद ५१) विरुद्ध महाराष्ट्र : (पहिला डाव) : ४५४ (स्वप्निल गुगळे १५४, चिराग खुराणा १२५, अंकित बावणे ५७;  अश्विन क्रिस्ट ४/८९).