सहा फुटांपेक्षा जास्त उंची, जमैका आणि जर्मनीची पाश्र्वभूमी, साधूला शोभेल असा केशसंभार, डाव्या बरगडय़ांवर गोंदलेला वडिलांचा टॅटू आणि एका छोटय़ा गाडीत राहून युरोपात स्पर्धा खेळणारा डस्टिन ब्राऊन केवळ एका दिवसाचा नायक ठरला. जागतिक क्रमवारीत अव्वल शंभरातही नसणाऱ्या ब्राऊनने राफेल नदालला नमवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत खळबळजनक विजयाची नोंद केली होती. मात्र अवघ्या चोवीस तासांत ब्राऊनचा हा विजय चमत्कार असल्याचे सिद्ध झाले. गुणवत्तेला सातत्याची जोड न देता आल्याने ब्राऊनला विम्बल्डन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. व्हिक्टर ट्रॉइकीने ब्राऊनला माघारी धाडले. अन्य लढतींमध्ये मारिन चिलीचने मॅरेथॉन लढतीत विजय साकारला. महिलांमध्ये कॅरोलिन वोझ्नियाकी, अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का यांनी विजयी आगेकूच केली.
नदालविरुद्धच्या ऐतिहासिक विजयातील दिमाखदार खेळापेक्षा ब्राऊनच्या जीवनशैलीची समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चा होती. वेस्ट इंडिजमधील बेटांवरल्या मनमौजी आणि अतरंगी व्यक्तिमत्त्वाच्या ब्राऊनने जर्मनीची ओळख असलेल्या चिवट सातत्याची जोड दिली आहे. मात्र विम्बल्डन स्पर्धेत नदालविरुद्ध दाखवलेले नैपुण्य ब्राऊनला ट्रॉइकीसमोर सादर करता आले नाही. ट्रॉइकीने ब्राऊनवर ६-४, ७-६, ४-६, ६-३ अशी मात केली. ट्रॉइकीच्या विजयासह डस्टिन ब्राऊन नामक एकदिवसीय चमत्कार संपुष्टात आला. अठराव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रॉजर फेडररने सॅम ग्रॉथवर ६-४, ६-४, ६-७, ६-२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
चार तास आणि ३१ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत मारिन चिलीचने जॉन इस्नरचा ७-६, ६-७, ६-४, ६-७, १२-१० असा पराभव केला.
पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या वोझ्नियाकीने कॅमिला गिओरगीवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. जेलेना जॅन्कोव्हिकने गतविजेत्या पेट्रा क्विटोव्हाचा ३-६, ७-५, ६-४ असा पराभव केला.

सानिया, पेस तिसऱ्या फेरीत
सानिया मिर्झा आणि मार्टिना हििगस जोडीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सानिया-मार्टिना जोडीने किमिको डेट क्रुम आणि फ्रान्सेस्का शियाव्होन जोडीवर ६-०, ६-१ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत लिएण्डर पेस आणि डॅनियल नेस्टर जोडीने ते इम्युराझ गाबाश्वहली आणि येन स्युन ल्यू जोडीवर ५-७, ७-६ (७-३), ७-६ (४), ७-५ अशी मात केली.

दुसरी वेगवान सव्‍‌र्हिस
रॉजर फेडररविरुद्धच्या लढतीत सॅम ग्रॉथने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतल्या दुसऱ्या वेगवान सव्‍‌र्हिसची नोंद केली. १४७ ताशी प्रतिमैल वेगाने ग्रॉथने सव्‍‌र्हिस केली. विम्बल्डन स्पर्धेतला टेलर डेंटचा १४८ ताशी प्रतिमैल वेगवान सव्‍‌र्हिसचा विक्रम थोडक्यात हुकला.