एक काळ क्रिकेटविश्वावर आपल्या कामगिरीने राज्य करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ आता एका विचीत्र संकटात सापडला आहे. येत्या १ जुलैपासून ऑस्ट्रेलियाच्या सुमारे २०० खेळाडूंवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ आणि ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन’ यांच्यात मानधनावरुन निर्माण झालेल्या वादामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर हे संकट ओढलं गेल्याचं बोललं जात आहे.

सामन्यातून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मिळणाऱ्या मानधनाचा एक ठरावीक हिस्सा खेळाडूंना देण्यात यावा अशी मागणी गेले काही दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने केली आहे. मात्र यामुळे आगामी खेळाडूंच्या भवितव्यासाठी पैसे उरणार नसल्याचं कारण देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रस्तावाला नकार दिला आहे. गेले काही दिवस दोन्ही संघटनांमधला हा तिढा काही केल्या सुटायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ग्रेग डायर यांनी १ जुलैपासून ऑस्ट्रेलियाच्या संघातील २०० खेळाडूंवर बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते असे संकेत दिले आहेत. यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नसली तरीही हा तिढा सोडवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळतेय.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तोडग्यासाठी काढलेल्या प्रस्तावाला ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने मान्यता दिलेली नाहीये. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा आगामी दक्षिण अफ्रिका दौरा, बांगलादेशविरुद्धची २ कसोटी सामन्यांची मालिका, भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि ऐतिहासीक अॅशेस टूरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. येत्या ३० जूनला दोन्ही संघटनांमधला सामजंस्य करार संपुष्टात येतोय, त्यामुळे या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या प्रश्नावर आता नेमका काय तोडगा निघतो आणि दोन्ही संघटनांमधला हा तिढा कसा सुटतोय याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेलं आहे.