महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, ही मागणी जोर धरत आहे. परंतु भारताचे माजी संघनायक राहुल द्रविड यांनी मात्र धोनीच भारताला चांगले भविष्य दाखवू शकेल, असे मत प्रकट केले आहे.
‘‘या क्षणी माझ्यापुढे धोनीला पर्याय दिसत नाही. धोनीकडे भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची क्षमता आहे,’’ असे द्रविडने सांगितले. इंग्लंडने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने भारताचा पराभव केला. या पराजयानंतर सुनील गावस्कर, के. श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी धोनीचे कर्णधारपद काढून घ्यावे अशी जोरदार मागणी केली.
‘‘सचिन तेंडुलकर हा क्रिकेट या खेळाचा राजदूत आहे. तो महान खेळाडू आहे आणि सध्याचा काळ त्याच्यासाठी खडतर आहे. प्रत्येक भारतीयाला सचिनचा अभिमान आहे. नागरिकांना सचिनच्या मनात काय चाललेय आणि तो कोणता विचार करतोय, हे कळायला हवे,’’ असे द्रविड यावेळी म्हणाला.