ऑलिम्पिकपटू ओ. पी. जैशाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतून परतल्यानंतर जैशाला ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर तिच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आणि त्यात तिला एच१एन१ अर्थात स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वी धावपटू सुधा सिंगलाही स्वाइन फ्लू झाल्याचे उघडकीस आले होते.

‘‘बंगळुरूत दाखल झालेल्या जैशाला ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिला बन्नरघट्टा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,’’ अशी माहिती ‘साइ’चे विभागीय प्रमुख श्याम सुंदर यांनी दिली. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत जैशाने मॅरेथॉन स्पध्रेत सहभाग घेतला होता.

जैशाला रक्ताचे नमुने देण्यासाठी राजी करताना ‘साइ’च्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जैशाने येथील राजीव गांधी संस्थेत रक्ताचे नमुने दिले.

‘‘रक्ताचे नमुने देण्यासाठी जैशाचा होकार मिळवणे म्हणजे कष्टाचे काम होते. तिने आमच्या समुपदेशनाकडे दुर्लक्ष केले आणि २१ ऑगस्टला रजेचा अर्ज दाखल करून ती ‘साइ’च्या आवारातून बाहेर पडली. अखेरीस राज्याच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी तिचा पत्ता शोधून काढला आणि तिला रक्ताचे नमुने देण्यास राजी केले,’’ असे सुंदर यांनी सांगितले.

आजारपणामुळे चौकशीत दिरंगाई

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय अधिकाऱ्यांनी पाणी आणि ऊर्जा पेय पुरवले नसल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या तपासात जैशाच्या आजारपणामुळे दिरंगाई होणार आहे.