नागपूर जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनच्यावतीने नागपूर चेस अकादमीसह एस.एन. श्रीवास्तव व कलावतीदेवी स्मृतीप्रित्यर्थ खुली बुध्दिबळ स्पर्धा ८ ते १५ डिसेंबरदरम्यान आयोजित केली आहे. डॉ. आंबेडकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचे सहकार्य या स्पध्रेला आहे. दरवर्षी व्ही.के. श्रीवास्तव त्यांच्या पालकांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरात बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करत असतात. त्यांच्या या उपक्रमाला बुध्दिबळातील नागपुरातील सहकारी सातत्याने सोबत करतात.
नागपूर चेस अकादमीने युवा खेळाडूंना ही चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांना शाळा, महाविद्यालये, कार्यालये बुडविण्याची गरज नाही. कारण, या स्पर्धा सायंकाळी आयोजित करण्यात आल्या आहेत. जुने आणि अनुभवी खेळाडू सुद्धा या स्पध्रेत सहभागी होऊ शकतात आणि युवा खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन यानिमित्ताने मिळू शकते. या स्पध्रेकरिता एकूण ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून पहिले पारितोषिक १० हजार रुपयांचे आहे. एकूण २८ पारितोषिक आणि २४ मेडल्सचा समावेश यात आहे. स्पध्रेत सहभागी होण्याकरिता ५०० रुपये प्रवेश फी असून स्पध्रेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर आहे. डॉ. आंबेडकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चच्या दीक्षाभूमी परिसरात ८ ते १५ डिसेंबरदरम्यान या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी शंकरनगरातील व्हीबीए सभागृहातील नागपूर चेस अकादमी येथे संपर्क साधावा.