खराब कामगिरी दाखवूनही भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण केल्याचा आरोप निवड समितीचे माजी अध्यक्ष के. श्रीकांत यांच्यावरही होत आहेत. निवड समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चाची बाहेर सविस्तरपणे वाच्यता होणे योग्य नाही, असे श्रीकांत यांनी हे आरोप फेटाळून लावताना गुरुवारी सांगितले.
निवड समितीचे माजी सदस्य मोहिंदर अमरनाथ यांची गौप्यस्फोटांची मालिका सध्या प्रसारमाध्यमांना खमंग खाद्य पुरवीत आहे. निवड समितीमधील पाच सदस्यांपैकी तीन जणांना धोनीला कर्णधारपदावरून काढून टाकावे, असे वाटत होते. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता, ही माहिती अमरनाथ यांनी सर्वासमोर आणली होती.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ‘व्हाइट वॉश’ पत्करल्यानंतरही श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती धोनीच्या पाठीशी राहिली होती. निवड समितीच्या बठकीमध्ये झालेल्या चर्चा सर्वासमोर येणे योग्य नाही, असे श्रीकांत यांनी सांगितले.
‘‘निवड समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चा चार भिंतींमध्ये मर्यादित राहतील, याची मी नेहमीच काळजी घेतली. मला किंवा अन्य कुणालाही आतमध्ये काय घडले, हे सविस्तरपणे मांडण्याचा अधिकार नाही,’’ असे श्रीकांत यांनी सांगितले. ‘‘कंपनीच्या विकासासाठी काय करावे आणि काय करू नये, याची रूपरेषा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये होत असते. या बैठकीमध्ये काय घडले हे कोणीही लोकांसमोर मांडत नाही. अशाच प्रकारे या बैठकीचीही गुप्तता जपायला हवी,’’ असे श्रीकांत या वेळी म्हणाले.
अमरनाथ यांच्या आरोपांवर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळत श्रीकांत यांनी सांगितले की, ‘‘निवड समितीच्या बैठकीमध्ये आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. धोनीचे कर्णधारपद किंवा अन्य अ, ब, क, ड.. असे विषय नेहमीच चर्चेत येतात. कर्णधारपद, वरिष्ठ खेळाडू, संघरचना या विषयांवर आम्ही सविस्तर चर्चा करतो. परंतु सरतेशेवटी या गोष्टींवर मतैक्य होते.’’ ‘‘भारतीय क्रिकेट आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. आता नागपूर कसोटी सामन्यात आपण चांगली कामगिरी करू आणि मालिका वाचवू, अशी आशा बाळगू,’’ असे श्रीकांत यांनी सांगितले. ‘‘निवड समितीचे सदस्य म्हणून आम्ही जे काही निर्णय घेतले ते देशाच्या हितासाठी घेतले. कधी आमची निवड योग्य असायची, तर कधी चुकायची. याच निवड समितीने २०११चा विश्वविजेता संघ निवडला होता. पण कुणीही आम्हाला याचे श्रेय दिले नाही. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलियात भारतीय संघ जेव्हा वाईट पद्धतीने हरला, तेव्हा आमच्यावर टीका मात्र झाली,’’ असे ते पुढे म्हणाले.