जयराम, प्रणॉय यांचीही आगेकूच; साईप्रणीत पराभूत

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकप्राप्त पी.व्ही. सिंधूने दमदार विजयासह कोर्टवर पुनरागमन केले. ऑलिम्पिक पदकानंतर सत्कार सोहळ्यांमुळे सिंधूला अनेक स्पर्धामध्ये सहभागी होता आले नाही.  कार्यक्रमांचा जोर ओसरल्यानंतर सिंधूने डेन्मार्क स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंगजिओवर २१-१४, २१-१९ असा विजय मिळवला. दरम्यान अजय जयराम, ए.एस. प्रणॉय यांनीही विजयी सलामी दिली. बी. साई प्रणीतला मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

जयरामने थायलंडच्या बुन्साक पोन्सानावर २१-१५, २१-१६ असा सहज विजय मिळवला. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या प्रणॉयने अटीतटीच्या सामन्यात मलेशियाच्या वेई फेंग चाँगवर २१-१३, १९-२१, २२-२० असा दणदणीत विजय मिळवला. स्वीस खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या प्रणॉयला पुढील फेरीत अव्वल मानांकित मलेशियाच्या ली चाँग वेई आणि हाँगकाँगच्या वेई नान यांच्यातील विजेत्याचा सामना करावा लागेल.

बी. साई प्रणीतला थायलंडच्या टॅनोग्साक सीनसोम्बून्सूक याच्याकडून निसटता पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या या खेळाडूने २१-१७, १९-२१, २१-१५ असा विजय मिळवत प्रणीतचे आव्हान संपुष्टात आणले. पुरुष दुहेरीत मनू अत्री व बी सुमीत रेड्डी या जोडीला डेन्मार्कच्या किम आस्त्रुप व अ‍ॅण्डर्स स्कारूप रस्मुसेन या जोडीकडून १०-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.

 

ठाण्याला दुहेरी मुकूट कुमारांमध्ये एअर इंडियाचे वर्चस्व

पुणे : ठाणे संघाने पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद मिळवित आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी कामगिरी केली. कुमार विभागात एअर इंडियाने कुमार मुले व मुली, युवा मुले व मुली या चार गटात विजेतेपद मिळवित निर्विवाद वर्चस्व गाजविले.

ठाणे संघाने पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघावर ३-१ अशी मात केली. त्या वेळी त्यांच्याकडून सिद्धेश पांडेने एकेरीचे दोन सामने जिंकून सिंहाचा वाटा उचलला. झुबिन तारापूरवालाने एकेरीचा एक सामना जिंकून त्याला चांगली साथ दिली. मुंबईकडून एरिक फर्नान्डीसने एक सामना जिंकला. महिलांमध्ये ठाणे संघाने अंतिम लढतीत मुंबई उपनगर संघावर ३-२ असा निसटता विजय मिळविला. ठाणे संघाच्या श्रुती अमृतेने एकेरीचे दोन सामनेजिंकले तर निर्णायक लढतीत तिची सहकारी ऋतुजा खोपकरने प्रीती भोसले हिला नमवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

एअर इंडियाने मुलांमध्ये ठाणे संघाला ३-० असे हरविले तर मुलींमध्ये त्यांनी पुणे संघावर ३-० याच फरकाने मात केली. कुमार गटात त्यांनी मुंबई शहरला ३-० असे पराभूत केले. मुलींमध्ये त्यांना मुंबई उपनगरविरुद्ध ३-१ असा विजय मिळाला.