पहिल्या व्यावसायिक जाहिरातीचा प्रस्ताव; आर्थिक कमाईत दहा पटीने वाढ

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाला गवसणी घालणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूवर पारितोषिकांबरोबरच जाहिरातींचा वर्षांव सुरू झाला आहे. तिचे नाममुद्रा मूल्य (ब्रँड व्हॅल्यू) दहा पटीने वाढले असून, हा आकडा आता दोन कोटी इतका झाला आहे. याचप्रमाणे लवकरच तिची पहिली व्यावसायिक जाहिरात झळकणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

‘‘सप्टेंबरमधील दुसऱ्या आठवडय़ात सिंधूच्या पहिल्या व्यावसायिक जाहिरातीचा तपशील जाहीर केला जाणार आहे. या सर्व जाहिरातींबाबत ऑलिम्पिकपूर्वीच करार झाला होता. मात्र सिंधू ही सराव शिबिरात असल्यामुळे तिच्या सरावात व्यत्यय येऊ नये म्हणून या जाहिराती ऑलिम्पिकनंतर झळकविण्याचे आम्ही ठरवले होते. आता ऑलिम्पिकमधील रौप्यपदकामुळे तिला जास्त लोकप्रियता लाभली आहे. यामधील बऱ्याचशा जाहिराती राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणार आहेत,’’ असे ‘बेसलाइन व्हेंचर्स’चे संस्थापकीय संचालक आर.रामकृष्णन यांनी सांगितले. ही संस्था सिंधूच्या नाममुद्रा विपणनाचे काम पाहत आहे.

‘‘सिंधूच्या रौप्यपदकानंतर तिला करारबद्ध करण्यासाठी आमच्याकडे अनेक कंपन्या व उद्योजकांची रांग लागली आहे. आम्हाला जास्त कालावधीसाठी या जाहिराती ठेवायच्या आहेत. कोणत्याही जाहिराती लोकप्रिय होण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. सिंधूची लोकप्रियता वाढली आहेच पण त्याचबरोबर तिच्या सदिच्छा मानधनातही वाढ व्हावी अशी आमची इच्छा आहे. सिंधूने देखील आमच्या संस्थेबरोबर काम करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे,’’ असे रामकृष्णन यांनी सांगितले.

‘‘सिंधूला राज्य शासनाने पाच कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. त्याखेरीज तिच्यावर रोख पारितोषिकांचा वर्षांव झाल्यामुळे

तिची किंमत वाढली आहे. ऑलिम्पिकपूर्वी तिचे २० ते ३० लाख रुपये नाममुद्रा मूल्य होते. आता ही किंमत दोन कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. अन्य खेळांपेक्षा ऑलिम्पिकमधील कामगिरी लोकांच्या मनात जास्त ठसलेली असते. त्याचाच फायदा सिंधूला मिळणार आहे,’’ असे नाममुद्रा मूल्य व व्यवसाय नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ हरीश बिजूर यांनी सांगितले.