कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले असताना रोहित शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रवींद्र जडेजाने आपली निवड योग्य होती हे सिध्द करून दाखवले. नासीर जमशेद आणि महंमद हफीज यांनी शतकी सलामी दिल्यानंतरही जडेजाने झटपट तीन बळी घेत पाकिस्तानच्या धावगतीला वेसण घातली. पाकिस्तानचा डाव २५० धावांत गुंडाळला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २५१ धावांचे आव्हान ठेवले आहे.     
अतिरिक्त फलंदाजाऐवजी पाचव्या गोलंदाजाला संघात स्थान देण्याचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा निर्णय फिरकीपटू रवींद्र जडेजाने योग्य ठरवत ४१ धावांत तीन बळी घेतले. त्याला इशांत शर्माने साथ देत ३३ धावांत तीन बळी घेतले.  
पाकिस्तानकडून भारताविरूध्दच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावणा-या सलामीवीर नासेर जमशेद ने या सामन्यातही १०६ धावा काढत सलग दुसरे शतक झाळकावले. मोहम्मद हाफिजनेही ७६ धावांची तडाखेबाज फलंदाजी केली.
पाकिस्तानचा अझर अली (२), युनुस खानला (१०), कर्णधार मिसबाहला (२), शोएब मलिक (२४) धावांवर बाद झाले. सईद अझमलला भुवनेश्वरकुमारने सेहवागद्वारे झेलबाद केले. शेवटी इशांत शर्माने गुलला (१७) आणि मोहम्मद इरफान (०) त्रिफळाचित करीत पाकिस्तानचा डाव गुंडाळला. भुवनेश्वरकुमार, अश्विन आणी रैनाने प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.