दोन दिवसांत निर्णय घेण्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे आवाहन
पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय होऊ शकला नाही, तर हा प्रस्ताव गुंडाळावा लागेल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) स्पष्ट करण्यात आले आहे.
पीसीबीचे प्रमुख शहरयार खान म्हणाले, ‘‘श्रीलंकेत छोटेखानी मर्यादित षटकांची मालिकेच्या प्रस्तावाबाबत पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा हा प्रस्ताव प्रत्यक्षात येणे कठीण आहे.’’
‘‘भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात झालेल्या बैठकीत क्रिकेटबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे ही मालिका होण्याची शक्यता मावळली आहे,’’ असे खान यांनी सांगितले.
‘‘जर ही मालिका झाली नाही, तर आम्हांला चार ते पाच कोटी डॉलर्सचा भरुदड पडणार आहे. श्रीलंकेतील मालिकेच्या दृष्टीने आम्ही तयारीला प्रारंभ केला असून, हॉटेलमध्ये बुकिंगसुद्धा करण्यात आले आहे,’’ असे शहरयार खान यांनी सांगितले.
‘‘दोन देशांतील राजनैतिक व्यक्तींमध्ये क्रिकेटबाबत चर्चा होईल, अशी मला आशा होती, परंतु आमची घोर निराशा झाली आहे,’’ असे ते पुढे म्हणाले.
‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आमच्याशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे ही मालिका व्हावी, अशी इच्छा होती. ही मालिका होत नसल्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार नाही. परंतु भारतात मार्चमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानच्या सहभागाचा निर्णय मात्र सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल,’’ असे खान यांनी स्पष्ट केले.
मालिकेचा निर्णय सरकारच घेऊ शकेल -ठाकूर
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान मालिकेच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्याची वेळ टळत चालली आहे. मात्र या बाबतचा निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ५ जानेवारीला प्रयाण करणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान मालिकेच्या योजनेसाठी अतिशय कमी अवधी उपलब्ध आहे.
‘‘सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौऱ्यात क्रिकेट मालिकेविषयी अनुकूलता दर्शवली जाईल, अशी प्रसारमाध्यमांना आशा होती. मात्र दोन देशांमधील राजनैतिक संबंधांचा प्रश्न येतो, तेव्हा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी बऱ्याच गोष्टी चर्चेला येतात,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.