पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद याने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरु असणाऱ्या एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याला मॅच फिक्सिंगसाठी विचारणा झाली होती. पण, त्याने लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि संरक्षण विभागाला याबद्दल कळवले. सरफराजने उघड केलेल्या या माहितीमुळे सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापकीय मंडळ आणि लाचलुचपत विभागालाही धक्का बसला आहे.

पाकिस्तान सुपर लीगसाठी शारजील खान आणि खालिद लतिफ या खेळाडूंवर बंदी घातल्यानंतर तरी हे सर्व प्रकार अटोक्यात येतील अशी त्यांना अपेक्षा होती. पण, वास्तवात मात्र वेगळेच दृश्य सध्या उघडकीस आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही याविषयीची माहिती उघड केली आहे. संघातील काही मोठ्या खेळाडुंशी बुकींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

वाचा : गावसकर, शास्त्रींमुळेच आम्ही चॅम्पियन्स करंडक जिंकलो, पाक संघ व्यवस्थापकाची खोचक टीका

प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती सर्व खेळाडूंना ओळखत असून तो यूएईचा रहिवासी असल्याचे कळते. गेल्या काही काळात मॅचफिक्सिंगचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक कठोर पावले उचलली होती. दुबईमध्ये सरफराजसोबत झालेली ही घटना उघडकीस आल्यानंतर ‘पीसीबी’ने खेळाडूंच्या राहण्याचं ठिकाणही बदलल्याचे कळते. यापूर्वीही सरफराजवर मॅच फिक्सिंगचा संशय असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. त्यात आता बुकींनी थेट त्याला दिलेली ऑफर आणि हे सर्व प्रकरण पाहता क्रिकेट वर्तुळात बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे.