२७ नोव्हेंबरला घोषणेची शक्यता
बहुप्रतीक्षित भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. याबाबत २७ नोव्हेंबरला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
भारत-पाकिस्तान मालिकेची चर्चा गेले काही दिवस ऐरणीवर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) भारतात खेळण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेत मालिका खेळण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ७ डिसेंबरला संपल्यावर भारताकडे फक्त एक महिन्याचा काळ उपलब्ध असेल. दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेचा याआधीच्या योजनेत समावेश होता. मात्र आता तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांनी नुकतीच पीसीबीचे प्रमुख शहरयार खान आणि वरिष्ठ पदाधिकारी नजम सेठ यांची इंग्लंड क्रिकेट मंडळाचे प्रमुख गाइल्स क्लार्क यांच्या उपस्थितीत भेट घेतली. मनोहर यांच्याशी अतिशय खेळीमेळीची चर्चा झाली, असे सेठी आणि खान यांनी बैठकीनंतर सांगितले.
मालिकेच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी पीसीबीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरयार खान इस्लामाबादला जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.