दक्षिण कोरियात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील एकेरीत सुवर्णपदक मिळविण्याची मला चांगली संधी आहे मात्र त्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा अडथळा असणार आहे, असे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता स्क्वॉशपटू सौरव घोशाल याने येथे सांगितले. गेल्या दोन आशियाई स्पर्धामध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
सौरव याला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. सुवर्णपदक मिळविण्यासाठी त्याला चार सामने जिंकावे लागणार आहे. त्यामध्ये त्याला प्रामुख्याने पाकिस्तानच्या खेळाडूंचे आव्हान असेल. तो म्हणाला, ही स्पर्धा माझ्यासाठी हुकमी संधी आहे. चार वर्षांपूर्वी मला बलाढय़ खेळांडूंशी झुंजावे लागले होते. गेल्या चार वर्षांमध्ये मी चांगली तयारी केली आहे. माझ्या संभाव्य प्रतिस्पर्धी खेळाडूंचाही मी बारकाईने अभ्यास केला आहे. बरेचसे स्पर्धक माझ्यापेक्षा कमी अनुभवी असले, तरी मी त्यांना दुय्यम दर्जाचे खेळाडू मानत नाही. तुल्यबळ स्पर्धक म्हणूनच मी त्यांना सामोरे जाणार आहे.