भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणावग्रस्त परिस्थितीमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) लिलावातून डच्चू देण्यात आला आहे. मुंबईत २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकही पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये सहभागी करून घेण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भरपूर प्रयत्न केले, पण या वर्षी तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
आयपीएलच्या सहाव्या मोसमाच्या लिलावात १०१ क्रिकेटपटूंवर बोली लागणार असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि त्याचा सहकारी मायकेल क्लार्कवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. पाँटिंग आणि क्लार्क यांना किमान २.१ कोटी रुपयांची मूळ किंमत मिळेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जोहान बोथा आणि भारताचा वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंग यांना विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरस असेल.
या यादीत भारताचे सात, इंग्लंडचे दोन आणि आर्यलडचा अष्टपैलू खेळाडू केव्हिन ओ’ब्रायन यांचा समावेश आहे.