पाकिस्तानने उत्कृष्ट सांघिक खेळ करीत भारताविरुद्ध फुटबॉलच्या दुसऱ्या मित्रत्वाच्या सामन्यात २-० असा सफाईदार विजय मिळविला. पहिला सामना भारताने १-० असा जिंकला होता.
पाकिस्तानने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. हा गोल कर्णधार कलिमुल्लाने ३९व्या मिनिटाला फ्रीकिकच्या आधारे केला. सामन्याच्या ९० व्या मिनिटाला सद्दाम हुसेनीने आणखी एक गोल करीत पाकिस्तानला सहज विजय मिळवून दिला.
पहिली चौदा मिनिटे दोन्ही संघांनी अपेक्षेइतक्या वेगवान चाली केल्या नाहीत. १५व्या मिनिटाला भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने केलेला प्रयत्न पाकिस्तानचा गोलरक्षक मुझामिल हुसेनने शिताफीने परतविला. कलिमुल्लानेही एक चांगला प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. ३७व्या मिनिटाला भारताच्या थोंगखोसेम होकिपने जोरदार चाल केली तर ३८व्या मिनिटाला त्याचा सहकारी प्रणय हलदार यानेही जोरदार मुसंडी मारली, मात्र हे दोन्ही प्रयत्न असफल ठरले. ३९व्या मिनिटाला पाकिस्तानला फ्रीकिक मिळाली, त्याचा फायदा घेत कलिमुल्लाने सुरेख फटका मारून गोल केला.
उत्तरार्धात भारताने बरोबरीसाठी सातत्याने चाली केल्या, मात्र पाकिस्तानच्या भक्कम बचावापुढे या चाली अपयशी ठरल्या. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना भारताच्या बचावफळीत थोडीशी शिथिलता आली. त्याचा फायदा घेत सद्दामने पाकिस्तानचा दुसरा गोल केला.